Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 26 March 2011

मातृभाषेला सावत्र आईचे स्थान नको - ऍड. व्हिएगस

पणजी, दि. २५ (पत्रक)
असे म्हणतात की ‘‘अनुभव हा खरा शिक्षक असतो’’. गेल्या २० वर्षांचा अनुभवानंतर आम्ही पुष्कळ काही शिकलो असून आमच्या मुलांना मातृभाषेतून शिकविणे हाच योग्य पर्याय आहे. संवाद साधणे, गाणी, गोष्टी, लोकगीते, लोकनृत्ये यांच्याशी मातृभाषेचे व मायभूमीचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे इंग्रजीचे स्तोम माजवून आपच्या मातृभाषेला सावत्र आईचे स्थान देण्याचा प्रयत्न होऊ नये. उलट इंग्रजीलाच ते स्थान देणे योग्य ठरेल, असे मत ऍड. आनाक्लेत व्हिएगसयांनी मांडले आहे.
सध्या गोव्यात गाजत असलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाबद्दल ऍड. व्हिएगस यांनी आपली मते सविस्तरपणे मांडली. त्यांचा गोषवारा पुढीलप्रमाणे ः
वीस वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करावे यासाठीच्या आंदोलनात सक्रिय भाग घेतल्याबद्दल आपणा सर्वांची मी जाहीर माफी मागतो. माझ्या त्याकाळी शाळेत शिकणार्‍या मुलांच्या यशस्वितेसाठी, किंवा राजकीय दबाव तथा इतर पालकांच्या सक्तीमुळेच कदाचित माझा निर्णय चुकलेला असेल, मात्र तो क्षमा करण्यासारखा निश्‍चितच नव्हता. तेव्हा शिक्षण माध्यम कृती समितीने हजारो लोकांना वेठीस धरले व सुमारे ५ दिवस रस्त्यावर आणून गोव्यातील जनजीवनही विस्कळीत केले. या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्यानंतरही सरकार, शिक्षणखाते, डायसोसन सोसायटी ऑफ एज्युकेशन, कोकणी भाषा मंडळ या सर्वांनी प्रखर विरोध दाखविला होता. मात्र १५ दिवसांसाठी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या चर्चिल आलेमांवनाइंग्रजी हे प्राथमिक शिक्षणाचे माध्यम करण्यात यश आले नाही. ही मागणी राज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी फेटाळण्यात आली होती.
भारतात राज्यांचे संघटन हे भाषांमुळेच झालेले आहे. भारतात प्रत्येक राज्याला स्वतःची भाषा आहे व पर्यायाने प्रत्येक सरकारी आणि अनुदानित शाळांचे तेच शिक्षणाचे माध्यम असते. प्रत्येक व्यक्ती प्राथमिक स्तरावर आपल्या शिकण्याच्या व बोलण्याच्या प्रक्रियेत आपल्या मातृभाषेचाच वापर करते. प्रत्येक राष्ट्राला भारतातील प्रत्येक राज्याप्रमाणे स्वतःची भाषा आहे व त्यांना आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान आहे.
जागतिक स्तरावर राज्याची भाषा हेच शिक्षणाचे माध्यम असते. आपले राष्ट्रीय नेते नेहमी आपल्या मातृभाषेतच बोलताना दिसतात. मात्र गोव्यातील अप्रामाणिक व मातीशी इमान नसलेले नेते, ज्यांनी सभेस उपस्थिती लावली त्यांनी मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलून आपल्या मातृभाषेशी प्रतारणा केली नाही का? उदाहरणार्थ (On what grounds does one’s club win a match? Ofcourse, on Fatorda ground. Isn’t it? ).आमचे पूर्वज सातासमुद्रापलीकडे गेले. मात्र शेवटी ते स्वगृहीच परतले. इंग्रजी भाषा हृदय, मन आणि शरीराच्या संवेदना भिकेला लावणारी आहे.
गेल्या २० वर्षात, जे विद्यार्थी (भेदभाव न करता) शाळांतून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत त्यांनी कोकणी, इंग्रजी, हिंदी किंवा इतर ऐच्छिक भाषांवर प्रभुत्व मिळविलेले आहे. आमचा देश हा केवळ दोन आणि तीन नव्हे तर बहुभाषिक देश आहे. आपल्या मातृभाषेतून शिकलेले वकील, डॉक्टर, शिक्षक, न्यायाधीश यांनी आपले सर्व व्यवहार मातृभाषेतूनच चालविले आहेत. कारण दुसरी कोणतीच भाषा आपल्या चालीरीती, परंपरा व लोकांचे राहणीमान समजावून देऊ शकत नाही. आपण इंग्रजी मातृभाषा म्हणून बिंबवून घेण्याचा प्रयत्न केला तर केवळ पाश्‍चात्त्य चालीरीतीच आपण स्वतःत बिंबवून घेऊ शकू, मात्र आपल्या मातीशी प्रामाणिक राहणे अशक्य बनेल.
माझ्या माहितीनुसार इंग्रजीचा उगम इंग्लंडात झाला. इंग्लंडात यूकेचा भाग असूनसुद्धा वेल्सने शाळांमध्ये इंग्रजी शिकविण्यास विरोध केला. या लहान राज्याने आपली भाषा, संस्कृती आणि ओळख कायम ठेवण्यासाठी हा मार्ग पत्करला. खरेच तेथील लोक स्वाभिमानीच!
गोव्याला कोकणी भाषेमुळेच देशात एक विशेष स्थान आहे व तिला शैक्षणिक स्तरावर मदत मिळाली नाही तर आम्ही राज्याची ओळख सांगणार तरी काय? याशिवाय एकेकाळच्या आमच्या कानात व हृदयात घुमणार्‍या ‘‘कोकणी उलय, कोकणी बरय, कोकणीतल्यान सरकार चलय’’ या घोषवाक्याचे काय? आम्ही आमच्या भाषेपासून लोकांना एकदम बाजूला सारण्याच्या तयारीत आहोत की काय?
मला सर्वांत मोठे कोडे पडले आहे ते डायसोसन सोसायटी ऑफ एज्युकेशनच्या धोरणाचे, ज्यांनी एके काळी शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे म्हणून आवाज उठविणार्‍या कृती समितीला असहकार्य केले होते. आता ते करत असलेल्या बिनडोक्याच्या या मागणीने आपण गोव्याचा आत्माच नष्ट करू नये. प्राथमिक स्तरावर प्रादेशिक भाषांमुळे जर नुकसानी होत असेल तर इंग्रजी हा सक्तीचा विषय सर्व विद्यार्थ्यांना शिकवू. मात्र याच्या उलट भूमिका घेऊ नये.

No comments: