पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
विविध सरकारी अनुदानित विद्यालयांत अन्य भाषांबरोबरच इंग्रजी विषयातून शिक्षण दिले जावे आणि यासंबंधीचा निर्णय येत्या २५ मार्चपर्यंत घेतला जावा, असा ठराव आज ‘फोरम फॉर चिल्ड्रन एज्युकेशन राईट’ने घेतला. प्राथमिक विद्यालयांत इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यासाठी आज आझाद मैदानावर घेण्यात आलेल्या जाहीर सभेत हा ठराव घेण्यात आला. तसेच, या ठरावाची अंमलबजावणी येत्या जुलै २०११ महिन्यापासून लागू करण्याचाही इशारा माजी सभापती तोमाझीन कार्दोज यांनी दिला. यावेळी हजारोंच्या संख्येने पालकांची उपस्थिती होती.
डायसोसन सोसायटीच्या १७५ विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना या सभेस उपस्थित राहण्यासाठी सक्तीचे करण्यात आले होते, असे अनेक पालकांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मंचाचे निमंत्रक प्रेमानंद नाईक, सचिव साव्हियो लोपीस, प्रदीप काकोडकर, लोरीन फर्नांडिस उपस्थित होते. तर, प्रेक्षकांत खुद्द शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, वनमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमाव तसेच, माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको, आमदार आग्नेल फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व व्हिक्टोरीया फर्नांडिस यावेळी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून झाले तरच कोकणी भाषेचा उद्धार होणार असा सिद्धांत यावेळी श्री. कार्दोज यांनी मांडला. तसेच, कोकणी आणि मराठी भाषेच्या विरोेधात ही सभा नसल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगण्याचा प्रयत्न केला. इंग्रजीला बाजूला ठेवून डायसोसन सोसायटीच्या विद्यालयांना संपवण्याचे हे षडयंत्र आहे. इंग्रजीच्या बाजूने पालक नसल्यास गेल्या दहा वर्षांत सरकारने १२५ नव्या इंग्रजी विद्यालयांना परवानगी कशी दिली, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पाल्यांचे भवितव्य ठरवणारे
शिक्षणतज्ज्ञ कोण ः लोपीस
विद्यार्थी ‘केजी’त शिकताना कोकणी किंवा मराठीतून शिकवले जाते. त्यानंतर प्राथमिक विद्यालयात पुन्हा भाषा बदलली जाते. त्यानंतर महाविद्यालयात गेल्यावर सर्व शिक्षण इंग्रजीतून असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणच इंग्रजीतून सक्तीचे केले जावे, असे साव्हियोे लोपीस म्हणाले. पाल्यांनी कोणता विषय घ्यावा हे पालकांना ठरवायला द्या, ते ठरवणारे शिक्षणतज्ज्ञ कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच, गोव्यातील शिक्षणतज्ज्ञ शैक्षणिक धोरण ठरवण्यास योग्य नसल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यालयांत शिकवली जाणारी मातृभाषा आणि घरात बोलली जाणारी मातृभाषा वेगळी आहे. त्यामुळे विद्यार्थी नापास होतात, असे मत यावेळी लोरीन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
जेथे कोकणीबद्दल प्रेम व्यक्त करायचे असते तेथे कोकणीवादी गप्प बसतात आणि नको तेथे प्रेम दाखवतात अशी टीका प्रदीप काकोडकर यांनी यावेळी केली.
प्राथमिक शिक्षणाबद्दल धोरणात्मक निर्णय घेणारे शिक्षणमंत्रीच या सभेत प्रत्यक्ष हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्याची भाषा करणार्या शिक्षणमंत्र्यांचा कल दिसून आला असून ते या फोरमच्या बाजूने झुकलेले आहेत, अशी टीका होऊ लागली आहे.
सक्तीची गर्दी?
‘फोरम फॉर चिल्ड्रन एज्युकेशन राईट’ने पालकांची दिशाभूल करून त्यांना या सभेला बोलावले, असा आरोप पिळर्ण सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर यांनी केला आहे. ही सभा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनीच आयोजित केली होती, असाही दावा त्यांनी यावेळी केला. आयोजकांच्या संगनमत करून पालकांची फसवणूक केली असल्याची टीका त्यांनी केली. या घटनेमुळे या सभेला उपस्थित असलेल्या अनेक पालकांनी सभेनंतर नाराजी व्यक्त केली. सभेत सहभागी होण्यासाठी काही पालकांवर सक्ती करण्यात आली होती असेही सांगण्यात आले.
Tuesday, 22 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment