विराट सभेत रामदेवबाबांचे जनतेला आवाहन
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
बेईमान नेते, विदेशी कंपन्या आणि माफियांना हद्दपार करून भारतात स्वर्ग स्थापन करावयाचा संकल्प आहे. यासाठी मी सांगेन त्यांनाच तुम्ही मतदान करणार ना, असा प्रश्न करून आज योग गुरु रामदेवबाबा यांनी हजारो गोमंतकीयांकडून इमानाची हमी घेतली. यावेळी गोव्याच्या कानाकोपर्यातून या भ्रष्टाचार विरोधी सभेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या लोकांनी आपले दोन्ही हात उंचावून या आवाहनाला होकार दिला. तसेच, आजपासून विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
भारत स्वाभिमान ट्रस्टने भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभर फुंकलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून आज कांपाल मैदानावर झालेल्या तिसर्या विराट सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वदेशीचे पुरस्कर्ते व विचारवंत गोविंदाचार्य, दिनेश वाघेला, डॉ. सूरज काणेकर, इक्बाल मोहम्मद, फा. बिस्मार्क, ऍड. सतीश सोनक, नागेश करमली, कु. हेतल, डॉ. रसिका, नारायण देसाई, निर्मला सावंत, गौरीश धोंड व मान्यवर उपस्थित होते.
भारताच्या गर्भात असलेल्या नैसर्गिक संपत्तीवर अमेरिकेच्या माफियांची नजर आहे. शंभरवेळा नवीन भारत वसवता येईल एवढी नैसर्गिक संपत्ती भारतात आहे. १५.१५ अब्ज टन लोह आहे. याची सरासरी किंमत ५५० लक्ष करोड रुपये होते. कोळसाच २७६.८१ अब्ज टन आहे. याची किंमत ९५० लक्ष करोड रुपये होते. हे केवळ ज्ञात असलेले भांडार आहे. त्यामुळे भ्रष्ट आणि बेईमान लोकांना न हटवल्यास ते देशाची सर्व संपत्ती लुटून नेतील, अशी भीती यावेळी रामदेवबाबांनी व्यक्त केली. आत्तापर्यंत या लुटारूंनी ४०० लक्ष करोड रुपये चोरून विदेशी बँकांत जमा केले आहेत. ते धन भारतात आणून त्याची वाटणी केल्यास १ लाख २० हजार कोटी रुपयांचा हिस्सा गोव्याला मिळू शकेल. या पैशांनी गोवा समृद्ध आणि बलशाली होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणाची सुरुवात रामदेवबाबांनी मराठी व कोकणी भाषेत करून गोव्यातील दोन्ही प्रादेशिक भाषांचे जोरदार समर्थन केले. तसेच, प्राथमिक विद्यालयात इंग्रजी भाषा करू पाहणार्यांनीही यावेळी त्यांनी इशारा देत सरकारच्या या कटकारस्थानाला भारत स्वाभिमान ट्रस्ट तीव्र विरोध करणार असल्याचेही स्पष्ट केले.
भारत अजून स्वतंत्र झालेला नाही. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र मिळालेले नाही. त्या दिवशी केवळ भारताने ब्रिटिशांशी ‘‘सत्तांतराचा करार’ केला. त्यानंतर देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी देशातील सभ्यता, संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सरदार वल्लभभाई पटेल नसते तर दोन वर्षातच ब्रिटिश पुन्हा भारतात आले असते, असा दावाही यावेळी रामदेवबाबा यांनी केला.
आता जुने खेळाडू चालणार नाहीत. आपल्याला आता नवीन मार्ग शोधावाच लागेल असे सूचक प्रतिपादन यावेळी गोविंदाचार्य यांनी केले. नागेश करमली, ऍड. सतीश सोनक, डॉ. काणेकर, डॉ. रसिका, फा. बिस्मार्क, इक्बाल मोहम्मद व अन्य वक्त्यांनी यावेळी आपली मते व्यक्त केली. शेवटी ‘वंदे मातरम्’ने सभेचा समारोप करण्यात आला.
Saturday, 26 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment