Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 20 March 2011

प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेतूनच हवे

गोव्याच्या अस्मितेची होळी करू देणार नाही
भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांची स्पष्टोक्ती
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे प्रादेशिक भाषेतूनच हवे हा जागतिक सिद्धांत आहे. या धोरणात बदल करून इंग्रजीची सक्ती करण्याचा सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांनी घातलेला घाट हाणून पाडणेच योग्य ठरेल. मतांवर डोळा ठेवून काही लोक जाणीवपूर्वक भाषावादाला फुंकर घालू पाहत आहेत. सत्तेच्या जोरावर गोव्याच्या अस्मितेची होळी करण्याचा हा डाव भाजप कोणत्याही परिस्थितीत सफल होऊ देणार नाही, असा कडक इशारा भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी दिला. विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेसचे आमदार तथा उपसभापती माविन गुदिन्हो यांनी उपस्थित केलेल्या या विषयावरून राज्यात पुन्हा एकदा भाषावाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघाडी सरकारातील अनेक आमदारांनी गुदिन्हो यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवत पुढील व्यूहरचनेचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमासंबंधी येत्या अधिवेशन काळात सरकार आपले धोरण जाहीर करेल, असे ठोस आश्‍वासन शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे हे धोरण ठरलेले असताना त्यात नव्याने बदल करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या सहकार्‍यांची वेळीच समजूत काढावी व त्यांना या विषयाचे राजकारण करण्यापासून परावृत्त करावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागतील असेही श्री. आर्लेकर यांनी सुनावले आहे.
नगरनियोजन खात्याचे मंत्री असताना प्रादेशिक आराखडा २०११ च्या निमित्ताने गोव्याचा भौगोलिक विनाश करण्याचा विडा उचललेले बाबूश मोन्सेरात आता शिक्षणमंत्री या नात्याने राज्याचा शैक्षणिक व सांस्कृतिक बट्याबोळ करण्याचा घाट घालू पाहत आहेत. मनोहर पर्रीकर यांनी शेफारलेल्या बाबूश यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे धाडस दाखवले होते. आता हेच धाडस मुख्यमंत्री दिगंबर कामत दाखवू शकतील काय, असे जाहीर आव्हान श्री. आर्लेकर यांनी दिले. मुळातच बाबूश यांच्याकडे शिक्षणखाते देऊन मुख्यमंत्र्यांनी गोव्याची मान शरमेने खाली घातली आहे. आता केवळ खुर्ची वाचवण्यासाठी बाबूश व त्यांच्या सहकार्‍यांचे थेर पुरवण्याची घोडचूक ते करणार असतील तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावेच लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
म.गो., राष्ट्रवादी, प्रदेश कॉंग्रेसचेही मौन
प्राथमिक शिक्षण माध्यमाच्या विषयावरून वातावरण तापत असताना आघाडीचे अन्य घटक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसने मौनव्रत धारण केले आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपली भूमिका नंतर स्पष्ट करू असे सांगून या विषयाला बगल दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी प्राथमिक माध्यमाबाबत पक्षाची भूमिका चर्चेअंती घेणार असल्याचे सांगितले. आपली वैयक्तिक भूमिका मांडताना त्यांनी प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे हाच निर्णय योग्य असल्याचे ठामपणे सांगितले. गेली चाळीस वर्षे आपण शैक्षणिक क्षेत्रात वावरत असल्याचे सांगून प्राथमिक स्तरावर प्रादेशिक भाषेचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. इंग्रजीचे अवास्तव स्तोम माजवून इंग्रजीला पर्यायच नाही असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून होत आहे. प्रादेशिक भाषेतून प्राथमिक शिक्षण घेऊन उच्चपदापर्यंत पोहोचलेली कित्येक उदाहरणे देता येतील. इंग्रजीतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सगळ्यांनीच गगनाला गवसणी घातली आहे असेही अजिबात नाही. या धोरणात बदल करण्याची अजिबात गरज नाही असे सांगून श्री. आर्लेकर यांनी मराठीचा पुरस्कार करणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष मूग गिळून गप्पअसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
दरम्यान, मगोचे कार्याध्यक्ष तथा आमदार दीपक ढवळीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments: