पणजी, दि. २३(क्रीडा वार्ताहर)
सध्या ‘वर्ल्डकप फीव्हर’शिगेला पोहोचलेला असताना सट्टाबाजार तेजीत चालला आहे. आपल्या गोव्यातच बघा ना. बायणा, वास्को मार्केट, म्हापसा मार्केट, पणजी, मडगाव अशा प्रमुख शहरी भागांत मोठ्या प्रमाणात बेटिंग चालते; मात्र मटक्यावरच कारवाई करण्यासाठी कुरबूर करणारे सरकार सट्टाबाजार कसा बंद करणार? स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विश्वचषक कोेण जिंकणार यासाठी भारत ३.१५ रु., द. आफ्रिका ४.६० रु., ऑस्ट्रेलिया ५.२० रु., श्रीलंका ५.४५ रु., पाकिस्तान ७.५० रु., इंग्लंड ९.५० रु., विंडीज २६ रु., न्यूझीलंड २७ रु. असा भाव होता. स्पर्धा सुरू होताच संघांची कामगिरी बघता हे चित्र पालटत गेले. प्रत्येक सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी दर निश्चित होतो व यानंतर दर दहा षटकांनी यांत बदल होत राहतो. पहिल्याच उपांत्यपूर्व लढतीतील वेस्ट इंडीजची खराब फलंदाजी बघता त्यांचा डाव संपला आणि या सामन्यासाठीचे ‘बेटिंग’ बंद झाले. सामन्यापूर्वी विंडीज जिंकणार यासाठी ५०० रुपयांना १०००; तर पाकिस्तानसाठी १००० रुपयांना १४०० असा दर होता. नेहमीच्या ग्राहक टेलिफोनद्वारे बेटिंग करतात. त्यांना एसएमएसद्वारे वेळोवेळी बदलत्या भावांची माहिती दिली जाते. उद्या होणार्या भारत- ऑस्ट्रेलिया सामन्याचा शुभारंभी भाव दु. १ पर्यंत निश्चित होईल. उद्या गुरुवारच्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली तर उपांत्य फेरीत भारत व पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. हा सामना म्हणजे दोन्ही संघांसाठी जीवनमरणाचा प्रश्न असेल. कारण आजदेखील या दोन्ही संघांमधील लढतीकडे धर्मयुद्ध म्हणूनच पाहिले जाते. अशा वेळी हटकून शारजात रंगणार्या ‘सीबीएफएस’ मालिकांची आठवण येते. पेट्रोलकिंग अब्दुल रेहमान बुखातीर व त्याचा जानी दोस्त तथा पाकिस्तानचा माजी कर्णधार आसिफ इकबाल यांनी चक्क वाळवंटात आलिशान क्रिकेट स्टेडियम उभारून तेव्हा तेथे स्पर्धा आयोजित करण्याचा चमत्कार घडूवून दाखवला होता. रसिकांना या गोष्टी आजही स्मरत असतील. तेव्हादेखील भारत पाकिस्तान यांच्यातील लढत म्हटले की, मुंगीलाही स्टेडियममध्ये प्रवेश मिळत नसे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यापेक्षा या उपांत्य लढतीवरच सर्वाधिक ‘बेटिंग’ होणार आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
Thursday, 24 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment