माणसाने म्हणे काळाप्रमाणे चालावे पण आपले ध्येय नजरेसमोर ठेवावे. उद्दिष्ट गाठायचे असल्यास कर्मयोगाचा मंत्र जपावा. कारण यश किंवा अपयश हे कधी सांगून येत नाही. त्यामुळे नशिबावर विसंबून बहुतेकजण आपले कार्य करत असतो. मालवणी भाषेतील म्हणीप्रमाणे,‘येळ टायट झाल्यार खेळ टायट नाजाल्यार सगळोच थयथयाट’. परंतु आजही अशी माणसे आहेत जी येणार्या संकटाशी दोन हात करतात आणि आपला खेळ नेहमी ‘टाईट’ ठेवतात. केवळ नशीब आणि दैवाच्या नावाने शंख करीत बसत नाहीत. मेहनतीने आणि चिकाटीने आपल्या मर्जीप्रमाणे नशीबच फिरवत ती जीवनात यशस्वीही होतात. आज पैसा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी माणसे आहेत तसेच आपल्या कष्टातून मिळवलेली दोनवेळची भाकरी गोड मानणारी माणसेही आहेत. त्यांना आपल्या कष्टाची भाकरीच जास्त प्रिय लागते. अशा यशाला कष्टाची झळाळी असल्याने ते आकाशाएवढे उत्तुंग व सागरासम विशाल असते. अशाचप्रकारे आकाशाला आपल्या कष्टाने गवसणी घालणारे पणजीतील सम्राट चित्रपटगृहाजवळ लिंबू सरबताचा गाडा चालवणारे ‘चंद्रकांत भंडारी.’
३७ वर्षांपूर्वी एका लहानशा गाड्यावर नोकरी करणार्या चंद्रकांतनी नंतर अनेकांच्या मदतीने स्वतःचा गाडा सुरू केला आणि लिंबूसरबत विकून आपल्या संसाराची घडी त्यांनी पक्की बसवली. महिन्याला केवळ ३० रुपये पगारावर नोकरी करणार्या चंद्रकांत यांनी पणजीसारख्या महागड्या शहरात स्वतःचा फ्लॅट घेतला आहे. माध्यमिक शिक्षण घेणार्या दोन मुली आणि पत्नी यांचे स्वाभिमानाने पालनपोषण करतात. याशिवाय त्यांनी नवीन रिक्षा विकत घेऊन मिळेल त्या वेळेत भाडे मारण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. गाड्यावर एका माणसाला त्यांनी नोकरीवर ठेवून त्याच्या राहण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या खर्चासहित त्याला महिन्याकाठी रू.४००० पगार दिला जातो. आज चंद्रकांत हे त्यांच्या लहानशा पण स्वाभिमानाने उभारलेल्या साम्राज्याचे बादशहा बनले आहेत.
या त्यांच्या यशाबद्दल त्यांना विचारले असता चंद्रकांत मोठ्या आनंदाने भरभरून बोलू लागले. आपल्या कष्टाची कुणीतरी दखल घेत आहे याचा त्यांना खूप आनंद होत असल्याचे त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. जणू त्यांची ही कथा त्यांना कुणाला तरी सांगायची होती आणि त्यांना तशी संधी मिळाली होती.
चंद्रकांत म्हणाले की, आपले मूळ गाव कारवार. परिस्थितीला कंटाळून गोव्यात नोकरी करावी म्हणून ३८ वर्षांपूर्वी गोव्यात आलो. त्यावेळी नॅशनल चित्रपटगृहाजवळील एका लिंबुसरबताच्या गाड्यावर पडेल ते काम करू लागलो. त्यावेळी दिवसाला एक रुपया याप्रमाणे महिन्याला ३० रु. पगार मिळायचा. कालांतराने येथील काही लोकांची ओळख झाली आणि त्यांनी माझ्या हाताची चव पारखली. त्यांनी स्वतंत्र गाडा सुरू करण्याचा सल्ला दिला केवळ सल्लाच नव्हे तर आर्थिक मदतही केली. म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो. यावेळी त्यांनी त्यांना गाडा उभारण्यास मदत केलेल्या लोकांना मनापासून धन्यवाद दिले. वास्तविक मदत करणार्यांनी त्यांचे कर्तव्य केले परंतु चंद्रकांतच्या यशाचे खरे कारण जर कोणते असेल तर त्यांची कामातील चिकाटी आणि ग्राहकाला ते देत असलेली सन्मानाची वागणूक हे स्पष्ट जाणवते. कारण आजही ग्राहक हेच आपले मायबाप म्हणून प्रत्येक ग्राहकाकडे चंद्रकांत आपुलकीने वागत असतात. साधा स्वभाव, शांत बोलणे आणि व्यवसायातील नीटनेटकेपणा यामुळे ग्राहकालाही त्यांचा आधार वाटतो किंबहुना त्यांना परत परत त्याच गाड्यावर यावेसे वाटते.
चंद्रकांत यांनी पुढे सांगितले की, आज आपल्याला केवळ मुलींच्या भवितव्याची चिंता आहे. त्या त्यांच्या जीवनात सुखी झाल्या की खर्या अर्थाने आपले जीवन परिपूर्ण झाले. त्यासाठी मी आजही तशीच मेहनत घेत आहे.
Monday, 21 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment