Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 21 March 2011

‘आकाश’क्षेपणास्त्र निर्मितीतही गोलमाल; तिघांना अटक

चेन्नई, दि. २०
एस बँड स्पेक्ट्रम वाटपाच्या मुद्द्यावरून ‘इस्रो’ची वाणिज्यिक शाखा अँट्रिक्स वादात अडकली असताना आता क्षेपणास्त्र निमिर्ती कार्यक्रमातही घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. ‘आकाश’ या क्षेपणास्त्र निमिर्तीच्या प्रक्रियेदरम्यान गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सीबीआयने याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यात सरकारी कंपनीच्या दोन संचालकांचा समावेश आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ’सोसायटी ङ्गॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च’ (समीर) या विभागात क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासंदर्भात संशोधन चालते. २००५ ते २००९ या आकाश क्षेपणास्त्राच्या निर्मिती कार्यक्रमादरम्यान एस. करुणाकरन आणि के. आर. किणी हे दोघे संचालकपदी होते. त्यातील करुणाकरन यांनी पदाचा गैरवापर करून त्यांचा मित्र व बेंगळुरूस्थित सॅम शिन प्रिसिजन प्रा. लि. या कंपनीचे संचालक पी. रतिनावेल यांना क्षेपणास्त्रात वापरण्यासाठी उपयुक्त असलेले इंटिग्रेटेड रेडिओ लाइन मोडेम्स (आयआरएलएम) बनवण्याचे कंत्राट दिले. त्यासाठी त्यांनी पात्रता असलेल्या सरकारी व इतर खासगी कंपन्यांनाही ङ्गाटा दिला. मित्राला कंत्राट देताना त्यांनी त्याच्या कंपनीत पैसाही गुंतवला. करुणाकरन यांच्यानंतर किणी यांनीही तोच कित्ता गिरवल्याने सरकारला लाखो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी दोघांविरोधात अँटिकरप्शन ब्युरो व भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सीबीआयने या दोघांसह रतिनावेल यांनाही अटक केली. या तिघांनाही १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तीन अधिकार्‍यांना अटक
भारतीय क्षेपणास्त्र आकाश प्रोजेक्टसाठी लागणार्‍या मोडेम पुरवठा प्रकरणी अनियमितेच्या गंभीर आरोपाखाली तिघांना सीबीआयने अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सोसायटी ङ्गॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ऍण्ड रिसर्च (समीर)च्या दोन माजी संचालकांचा समावेश आहे.
‘समीर’चे संचालक के. करुणाकरण, के. आर. किणी यांना लाललुचपत प्रतिबंधक विभागाने विविध कायद्यांखाली आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत अटक केल्याची माहिती सीबीआयने दिली. चेन्नईच्या सॅम शिन प्रिसिजन्स प्रा. लि. आणि बंगळुरूस्थित वेव्ह टेक इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि.चे संचालक पी. रथिनवेल यांनाही अटक करण्यात आली आहे. ‘ समीर’ ही केंद सरकारच्या संपर्क आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अख्यत्यारित येणारी संस्था आहे. संपूर्ण अनुदानित असलेली संस्था संरक्षणाशी संबंधित प्रोजेक्टशी संबंधित काम करते. रथिनवेल हे करुणाकरन यांच्याबरोबर शिकत होते. दोघांनी वेगवेगळ्या नावाने कंपन्या सुरू केल्या. या दुसर्‍या कंपनीच्या माध्यमातून ‘समीर’ला मिळणार्‍या कंत्राटावर लक्ष ठेवण्याचे काम केले जात होते. सॅम शिन प्रिसिजन्स कंपनी जेव्हा सुरूही झाली नव्हती आणि जेव्हा तिची रितसर नोंदणीही झाली नव्हती तेव्हाच तिला काम देण्याचे काम ‘समीर’ने केले. २००५ ते२००९ या कालावधीत करुणानकरन यांनी पदाचा दुरुपयोग करत सॅम शिन प्रिसिजन प्रा. लिमिटेडला झुकते माप दिले. अन्य कंपन्यांना डावलून सॅम शिनला आकाश क्षेपणास्त्र कार्यक्रमामध्ये वापरल्या जाणार्‍या इंटीग्रेटेड रेडिओ लाइन मोडेम पुरवण्याची कंत्राटे मोठ्या प्रमाणावर दिली गेली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती उघडकीस आले. त्यामुळेच सीबीआयने ही कारवाई केली.

No comments: