पोलिस - ड्रगमाफिया साटेलोटेप्रकरणी
सीबीआयची ‘अजब’ सबब
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
पोलिस - ड्रगमाफिया साटेलोटे प्रकरणाची चौकशी करण्यास ‘सीबीआय’ला गोव्यातील स्थानिक भाषेची अडचण आहे. तसेच, त्यांच्याकडे अद्ययावत यंत्रणा नाही. आधीच त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने अनेक तक्रारी चौकशीसाठी दिल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण ते घेऊ शकत नाही, अशी विचित्र सबब आज केंद्रीय गृहखात्याच्या कार्मिक विभागाच्या साहाय्यक सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली.
मात्र, या पत्रामुळे न्यायालयाने केंद्र सरकारच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. यावर पुन्हा विचार करा आणि येत्या दोन आठवड्यांत ठोस निर्णय कळवा, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारला देत पत्र लिहिणार्या अधिकार्याची बरीच खरडपट्टी काढली.
गोवा सरकार हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यास तयार असेल तर तुम्हांला कसली अडचण आहे, असा प्रश्नही न्यायालयाने केला. पोलिस - ड्रगमाफिया प्रकरणात गंभीर प्रकारचे आरोप झालेले आहेत. तुम्ही अशी जबाबदारी झटकू शकत नाही. गोव्यातील सीबीआयकडे साधनसुविधा नसल्यास ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. त्यामुळे तुम्ही सीबीआय विभाग अद्ययावत नाही, असे सांगू शकत नाही. त्यांना जी मदत लागेल ती राज्य सरकारने करावी, अशी सूचना राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांना न्यायालयाने केली.
केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक प्रमोद मुदभटकल यांनी यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गोव्यातील स्थानिक पोलिसांकडे अद्ययावत सुविधा आहेत. त्यामुळे ते आमच्यापेक्षा चांगली चौकशी करू शकतात. तसेच, आमच्याकडे अधिकार्यांचीही कमतरता आहे. या पूर्वीच सर्वोच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयांनी अनेक प्रकरणे चौकशीसाठी सोपवली आहेत. तसेच, या प्रकरणात कोणीही केंद्र सरकारशी निगडीत व्यक्ती गुंतलेली नाही.
या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांच्यावरही आरोप झाले असून आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्राने त्याच्या नावासकट वृत्तही प्रसिद्ध केले होते. आता ‘केंद्र सरकार’ आणि ‘सीबीआय’ या प्रकरणाची चौकशी करण्यास का तयार नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
Wednesday, 23 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment