पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): प्रादेशिक भाषा हा विद्यार्थ्यांचा आत्मस्वर असून या भाषेतूनच मुलांना ज्ञानाचे चांगल्या रीतीने आकलन होऊ शकते. आपला सुयोग्य विकास साधून मुले उत्तुंग भरारी घेऊ शकतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे प्रादेशिक भाषेतूनच देणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, इतिहास संशोधक, लेखक व विद्यार्थिप्रिय शिक्षक प्रा. राजेंद्र पांडुरंग केरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
गोव्यातील काही इंग्रजीप्रेमी ‘डायोसेशन’ सोसायटीच्या सहकार्याने गोव्यातील प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषेतून व्हावे अशी जोरदार मागणी करत आहेत. याबाबत गोव्यातील अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रा. केरकर म्हणाले की, मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी किंवा कोकणी या प्रादेशिक भाषांतूनच प्राथमिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेतून घेतल्यास गोव्याची अस्मिता चांगल्या रितीने जपली जाऊ शकते. गोव्याचे नाव सातासमुद्रापलीकडे नेलेले अनेक नामवंत गोमंतकीय प्रादेशिक भाषेतूनच शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील वर्गात इंग्रजी भाषा आहेच. त्यामुळे सध्या जे शैक्षणिक धोरण चालू आहे तेच योग्य आहे. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या नामवंतांच्या शिक्षणाचा अभ्यास केल्यास सत्य काय ते समोर येईलच असे सांगून प्रा. केरकर यांनी गोव्याच्या अस्मितेवर घाला असलेली इंग्रजी माध्यमाची मागणी फेटाळून लावावी असे मत व्यक्त केले.
माणसाचा सर्वांगीण विकास त्याच्या प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असतो. येथील प्रादेशिक भाषा चांगल्या विकसित आहेत. प्रादेशिक भाषांतून आपली मातृभूमीप्रति असलेली आपुलकी स्पष्ट होते. ज्या लोकांना प्राथमिक माध्यम इंग्रजी हवे आहे त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी खाजगी शाळांत भरती करावे. मात्र, उगाच संपूर्ण गोव्यातील लोकांना वेठीस धरून राज्याचे शैक्षणिक क्षेत्र कलंकीत करू नये, असेही प्रा. केरकर यांनी शेवटी सांगितले.
Sunday, 20 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment