कदंब चालकांचा इशारा
• आंदोलनाचा चौथा दिवस • आज मुख्यमंत्र्यांची बैठक • उपोषणकर्त्यांचे आरोग्य खालावले.
पणजी, दि.२० (प्रतिनिधी)
सेवेत कायम करावे म्हणून पणजी कदंब स्थानकावर आमरण उपोषणास बसलेल्या १०० कदंब चालकांना उद्या दि. २१ रोजी मुख्यमंत्र्यासोबत होणार्या बैठकीत न्याय न मिळाल्यास दि. २२ पासून या आमरण उपोषणात चालकांचे सारे कुटुंबीय सहभागी होईल, असा इशारा आज या त्रस्त चालकांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आमरण उपोषणाला बसलेल्या या चालकांचा आज चौथा दिवस असून आज दोघांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हलवण्यात आले. तर, अजून काहींची तब्येत नाजूक बनली असल्याचे सांगण्यात आले.
गेली आठ ते दहा वर्षे कदंब महामंडळाकडे रोजंदारीवर काम करणार्या या सुमारे १०० चालकांनी सेवेची पाच वर्षे झालेल्या ६८ चालकांना सेवेत कायम करावे व इतरांना ३४८ रुपये रोजंदारी द्यावी, या मागणीसाठी दि.१८ मार्चपासून कदंब स्थानकावर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
चालक अत्यवस्थ, स्थानकावर तणाव -
आमरण उपोषणाला बसलेल्या चालकांपैकी अनेकांना अत्यवस्थ वाटू लागल्याने आज उल्हास हरमलकर व कमलाकांत हळदणकर या दोन चालकांना १०८ रुग्णवाहिकेतून इस्पितळात हलवण्यात आले. काल उल्हास घुरे यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र जसजसे चालक अत्यवस्थ होत आहेत तसतसा कदंब स्थानकावर तणाव वाढत चालला असून या चालकांच्या जीविताला बरे वाईट झाल्यास येथे स्फोटक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
तर महामंडळ बंद करू
उद्या दि.२१ रोजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी होणार्या बैठकीत या कदंब चालकांची मागणी मान्य झाली नाही तर दि.२२ पासून कदंब महामंडळाच्या सर्व बसेस बंद ठेवण्यात येतील, असा सज्जड इशारा आज आयटक प्रणीत कदंब महामंडळ चालक संघटनेचे अध्यक्ष ज्योकीम फर्नांडिस यांनी दिला.
उद्या संध्याकाळी या चालकांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कदंब महामंडळाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, वाहतूक संचालक अरुण देसाई, कदंबचे व्यवस्थापकीय संचालक वेनान्सियो फुर्तादो व वित्त सचिव यांच्यासह कदंब चालकांचे नेते पुती गावकर यांची सयुंक्त बैठक पर्वरी येथील सचिवालयात बोलावली आहे. गेली अनेक वर्षे सेवेत कायम करण्याची अनेक आश्वासने दिलेल्या या चालकांना या बैठकीत न्याय मिळेल अशी आशा या चालकांनी व्यक्त केली आहे.
या चालकांना सेवेत कायम करु, अशी आश्वासने अनेक वेळा कदंबचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संबंधित अधिकार्यांनी दिली होती. त्यामुळे या आश्वासनाला भुलून या चालकांनी वेळोवेळी केलेली आंदोलने मागे घेतली. मात्र यावेळी हे चालक, ‘तोडगा हवाच त्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर!’ म्हणून जिद्दीने आमरण उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी न्याय न दिल्यास आपल्या कुटुंबीयांना या उपोषणात सहभागी करण्याचा निर्धार या चालकांनी व्यक्त केला आहे, असे श्री. फर्नांडिस यांनी सांगितले.
विविध संघटनांचा पाठिंबा -
कदंबच्या चालकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या लोकशाही मार्गाच्या आमरण उपोषणाला विविध संघटना, राजकीय नेते यांनी पाठिंबा दिला असून या चालकांची न्याय्य मागणी मान्य व्हायलाच हवी असे प्रतिपादन केले आहे. काल दि. १९ रोजी आमदार दयानंद सोपटे, आमदार अनंत शेट, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका आदींनी या चालकांची भेट घेतली व आपला पाठिंबा व्यक्त केला.
या चालकांना पाठिंबा व्यक्त करताना कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले की, राज्यात कष्टकर्यांना न्याय मिळणे कठीण झाले असून न्याय्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी भूमिपुत्रांना सतत आंदोलने करावी लागत आहेत ही राजकारण्यांचे अपयश दर्शवणारी बाब आहे. मंगळवारपासून ‘आयटक’ या चालकांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देणार आहे असे सांगितले.
सुमारे १०० चालकांनी या आमरण उपोषणात भाग घेतला असल्यामुळे कदंब महामंडळाची संपूर्ण गोव्यातील बस सेवा विस्कळीत झाली असून विविध ठिकाणच्या अनेक बसेस रद्द करण्याची पाळी महामंडळावर आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
दरम्यान, कदंब महामंडळाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी उद्या दि .२१ रोजी मुख्यमंत्र्यासोबत होणार्या बैठकीत या चालकांना न्याय मिळेल. त्यांनी उपोषण मागे घेऊन कामावर जावे असे आवाहन केले आहे.
Monday, 21 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment