Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 22 March 2011

आरोप सिद्ध केल्यास राजकारण संन्यास - पर्रीकर

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
कुठल्याही बारीकसारीक विषयांवरून सभागृहामध्ये होत असलेल्या महत्त्वपूर्ण कामकाजात व्यत्यय निर्माण करण्यास माझा विरोध आहे. अशा व्यत्ययामुळे सभागृहाचे पावित्र्य तर भंग होतेच; शिवाय त्यामुळे सभागृहाचा बहुमोल असा वेळही वाया जातो, असे मला प्रामाणिकपणे वाटते. मात्र आज जे काही घडले ते क्रीडामंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आपल्यावर केलेल्या वैयक्तिक स्वरूपांच्या बेताल आरोपांमुळेच! माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍या बाबू आजगावकर यांनी मी कोणाकडूनही पैसे घेतल्याचे पुराव्यासह सिद्ध करावे; ते त्यांनी सिद्ध केल्यास राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असे आव्हानच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी नंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिले.
‘सीबीआय’कडे माझ्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत दोनदा मला ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे. हे ठाऊक असतानाही बाबू आजगांवकर बेताल आरोप करत सुटल्याने माझ्याकडे विरोधात आवाज उठवण्यावाचून गत्यंतर नव्हते. आजगावकर यांच्याकडे त्या संदर्भात आणखी काही पुरावे असतील तर त्यांनी ते जरूर ‘सीबीआय’कडे सुपूर्द करावेत व माझ्या विरोधात नव्याने तक्रार दाखल करावी, असेही आव्हान पर्रीकर यांनी क्रीडामंत्र्यांना दिले.
मी कधीही कुणाकडून कोणत्याही कामासाठी एक पैदेखील घेतलेला नाही की कुणाकडून साधी चहाही उकळलेला नाही, या गोष्टीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

No comments: