पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
भारतावर बराच काळ इंग्रजांची सत्ता राहिल्यामुळे देशात इंग्रजीचे प्राबल्य वाढले हे जरी खरे असले तरी लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पांडुरंग नाडकर्णी यांनी केले आहे.
गोव्यात सध्या सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षण माध्यमाच्या वादासंबंधी शिक्षण क्षेत्रात बराच काळ योगदान दिलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पांडुरंग नाडकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की, आपला देश बराच काळ इंग्रजांच्या अमलाखाली राहिल्यानेच त्यांची भाषा इथे फोफावली. परंतु, याचा अर्थ प्रादेशिक भाषांना डावलून इंग्रजी भाषेला इथे मोकळे रान द्यावे, असा होत नाही. तसे झाल्यास गोव्यातील प्रादेशिक भाषांचे अस्तित्वच नष्ट होईल, अशी भीती डॉ. नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
जगभरातील जादातर देशांतील विद्यार्थी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या प्रादेशिक तथा मातृभाषेतूनच घेतात व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी विविध भाषांचा विचार करतात. प्रादेशिक भाषा शिकून अनेक प्रज्ञावंतांनी आपल्याबरोबरच आपल्या देशाचे नावही उज्वल केले आहे. त्यामुळे इंग्रजीतून शिकणार्या मुलांचा चांगला बौद्धिक विकास होतो हा काही पालकांचा असलेला समजच मुळी चुकीचा असून मुलांच्या बौद्धिक विकासास प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देण्याची गरज आहे, असे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. जगातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी प्रादेशिक भाषेतून प्राथमिक शिक्षणाचे समर्थन केले असून गोवा त्याला अपवाद ठरूच शकत नाही असे सांगून डॉ. नाडकर्णी म्हणाले की प्राथमिक शिक्षणानंतर इंग्रजी शिकण्यास काहीही हरकत नाही मात्र प्राथमिक स्तरावर इंग्रजीचा आग्रह धरणे उचित नसून गोव्यात सध्या जी शिक्षणप्रणाली चालू आहे ती उत्तम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment