Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 March 2011

मस्तवाल कांगारूंचा नक्षा उतरवला..!

अहमदाबाद, दि. २४
तब्बल तीन वेळच्या विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा विजयरथ जमिनीत गाडून महेंद्रसिंग धोनीच्या जिगरबाज शिलेदारांनी उपांत्यपूर्व फेरीत पाच गडी राखून तुफानी विजय संपादला आणि गोव्यासह देशभरात जणू दिवाळीच साजरी झाली...
भारताच्या या अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार ठरले ते सामनावीर युवराजसिंग आणि त्याला तेवढीच तोलामोलाची साथ दिलेला सुरेश रैना. राम-लक्ष्मणाची ही जोडी एकत्र आली आणि त्यांनी उद्धट रिकी पॉंटिंगचे दात अक्षरशः त्याच्या घशात घातले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारलेल्या ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत २६० धावा चोपल्या. तथापि, भारताने हे लक्ष्य ४७.४ षटकांतच पार केले. मग येथील मोतेरा स्टेडियमवर जमलेल्या सार्‍या प्रेक्षकांनी फेरच धरला. स्टेडियमच्या प्रत्येक भागात तिरंगा दिमाखात फडकावण्यात आल्याचे दृश्य पाहून अनेकजण भावनावश झाले. सर्वत्र आनंदाला उधाण आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर यांनी भारतीय विजयाचा पाया रचला व युवी आणि रैना कळस बनले. आता भारताला उपांत्य फेरीत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी मोहालीत दोन हात करायचे आहेत. या विजयाचे श्रेय वेगळ्या अर्थाने सचिनला द्यावे लागेल. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत गमावल्यानंतर त्याने स्वीकारलेले मौन सर्वच खेळाडूंच्या जिव्हारी लागले होते. आजच्या लढतीत सगळेच वीर त्वेषाने लढले आणि कांगारूंचा गड त्यांनी भुईसपाट केला. सारेच अविस्मरणीय, विस्मयजनक आणि अवर्णनीय. ओहोऽऽऽ भारत जिंकला रे.. जिंकला...

No comments: