विरोधकांबरोबरच नार्वेकरांकडूनही सरकारचे वाभाडे
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
कदंब महामंडळाच्या बदली चालकांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी विरोधी सदस्यांसह सत्ताधारी गटाचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी आज विधानसभेत प्रचंड गदारोळ माजवला. कायद्याचे रक्षण करण्याचे सोडून स्वतःच कायदा मोडणारे हे सरकार बहुजन समाजविरोधी असल्याचा जळजळीत आरोप नार्वेकर यांनी केला. त्याबरोबर ‘शेम शेम’च्या घोषणा देत संतप्त विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या हौद्यात धाव घेतली. सभापती प्रतापसिंह राणे यांनी सदस्यांना आवरण्यासाठी वारंवार सूचना केल्या. तथापि, या संवेदनशील विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या सूचना धुडकावून लावल्या व गदारोळ सुरूच ठेवत विधानसभेचे कामकाज दुपारी काही वेळासाठी तहकूब करण्यास भाग पाडले.
शून्य प्रहराला आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व दयानंद नार्वेकर यांनी कदंब चालकांना सेवेत कायम करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. गेल्या सहा दिवसांपासून हे चालक आपल्या मागणीसाठी कदंब स्थानकावर आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र सरकारकडून त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. हे सरकार सामान्यांप्रति एवढे असंवेदनशील का, असा खडा सवाल त्यांनी आपल्या सूचनेद्वारे उपस्थित केला. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी थातूरमातूर उत्तर देत या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, दक्ष विरोधकांनी त्यांची चाल उधळून लावताना नार्वेकरांच्या साथीने वाहतूकमंत्र्यांना सभागृहात ‘सळो की पळो’ करून सोडले.
कदंब महामंडळ व कामगार आयुक्तांशी झालेल्या करारात पाच वर्षे सेवा दिलेल्या चालकांना सेवेत कायम करण्याचा समझोता झाला होता. त्यांना सेवेत कायम करण्याचे सरकार केवळ आश्वासन देत आले आहे. मध्यंतरी तीन चालकांचे निधनही झाले. त्यांच्या मुलाखती, वैद्यकीय चाचणी सर्व काही झाले असताना त्यांना सेवेत कायम न करता का झुलवत ठेवले जात आहे, असा संतप्त सवाल नार्वेकर यांनी केला. या बदली चालकांना रोज सुमारे २५० रुपये एवढे तुटपुंजे वेतन दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. चालक नाहीत म्हणून खेड्यातील कदंबच्या बसगाड्यांच्या फेर्या स्थगित केल्या आहेत. सरकार कामगार आयुक्तांशी केलेल्या कराराचा भंग का करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
आमदार पार्सेकर यांनीही सरकारवर तुफानी हल्ला चढवला. गेले सहा सात दिवस हे चालक उपोषण करत असून सरकारतर्फे कोणीही त्यांची विचारपूस करत नाही. अत्यल्प वेतनावर त्यांना हे सरकार राबवत असून त्यांचे एकप्रकारे शोषणच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. हे गरीब घटकांतील लोक असून कष्टकरी आहेत असे सांगून त्यांच्या मागणीकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पालक गरीब असल्यामुळे हे चालक शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यामुळेच ते चालक झाले असले तरी आपल्या मुलांना त्यांना शिकवायचे आहे. सरकारला त्यांची मुले शिकलेली नको आहेत का, असा सवाल पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी केला. या महामंडळात कनिष्ठ कारकून व रोखपालांच्या भरतीसाठीच्या मुलाखती सुरू असून सेवेत कायम केल्यास या चालकांच्या वेतनासाठी निधी नाही तर नव्याने भरती करणार्यांना कुठून वेतन देणार, असा संतप्त सवाल करत सोपटे यांनी ढवळीकर यांना चांगलेच धारेवर धरले.
वाहतूकमंत्री ढवळीकरांना विरोधकांनी पुरते कोंडीत पकडल्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हस्तक्षेप करत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. या चालकांना सेवेत घेऊ; त्यासाठी प्रक्रिया तरी पूर्ण करू द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. वयोमर्यादा ओलांडली तरी त्यासाठी विशेष सवलत देत त्यांना सेवेत घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तथापि अशा आश्वासनावर आमचा विश्वास नाही. त्यांना तात्काळ सेवेत घ्या. नव्याने मुलाखती, वैद्यकीय चाचणीचा फार्स करण्यामागील राजकारण आम्हांला चांगलेच माहीत आहे, असा टोला हाणत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला दाद दिली नाही. सभागृहातील गदारोळ त्यामुळे वाढतच गेला. सभापती राणे यांनी वारंवार विरोधकांनी शांतता राखण्याची सूचना केली. परंतु विरोधकांनी त्यांना जुमानले नाही. पार्सेकर, सोपटे, दिलीप परूळेकर, दामोदर नाईक, महादेव नाईक, रमेश तवडकर यांनी सरकारविरोधी जोरदार नारेबाजी करत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. त्यामुळे सभापतींनी
कामकाज तहकूब केले.
Friday, 25 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment