माध्यम बदलण्यास एन. शिवदास यांचा तीव्र विरोध
पणजी, दि. २० (प्रतिनिधी)
गोव्याची प्रादेशिक अस्मिता सांभाळण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे प्रादेशिक भाषेतूनच हवे. प्राथमिक शाळेचे माध्यम इंग्रजी हवे म्हणणारे हे शिक्षणतज्ज्ञ नसून ते विदेशी प्रवृत्तीचे गुलाम आहेत. त्यांच्या दबावाला बळी पडून सरकारने माध्यम बदलण्याचा प्रयत्न केल्यास कोकणी भाषेसाठी जसा तीव्र लढा उभारला होता तसा पुन्हा एकदा उभारू असा इशारा कोकणी अकादमीचे अध्यक्ष तथा लेखक एन. शिवदास यांनी दिला आहे.
गोव्यातील प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करावे अशी मागणी काही इंग्रजाळलेल्या लोकांनी केली असून याबाबत गोव्यात सध्या बरीच खळबळ माजली आहे. याबाबत एन. शिवदास यांना विचारले असता त्यांनी सदर मागणी करणार्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की, जागतिक विचारवंत तसेच महात्मा गांधी यांनीसुद्धा प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो हा सिद्धांत मांडलेला आहे. भारतातील विविध भाषांतील विचारवंतांचासुद्धा हाच विचार आहे. मात्र विदेशी संस्कृतीचा पुळका असणारे व गुलामी वृत्तीचे काही अल्पशिक्षित लोक इंग्रजी माध्यम करण्याची मागणी करत आहेत हे दुदैव आहे. निवडून आलेले अल्पशिक्षित मंत्री व राजकारणी त्यांना साथ देत आहेत हे अयोग्य आहे.
ते पुढे म्हणाले की, शिक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी गोव्यात अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते काम त्यांच्यावर सोपवणे गरजेचे असून शिक्षण क्षेत्राचा गंध नसलेल्या ‘सोसायटीने’ हे काम स्वतःवर घेऊ नये असा उपरोधिक सल्लाही यावेळी त्यांनी दिला. मातृभाषेतून शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध व मूलभूत हक्क असून या हक्कापासून डावलणे कुणालाही शक्य नाही असे सांगून ज्यांना आपल्या मातृभूमीबद्दल जरासुद्धा आस्था नाही, ज्यांच्यात स्वतःबद्दल अस्मिता नाही तेच लोक इंग्रजीची तळी उचलून धरत आहेत अशी टीका एन शिवदास यांनी संबंधितांवर केली.
इंग्रजी ही जागतिक भाषा नव्हे
काही लोक जगात सर्वत्र इंग्रजी बोलली जाते. त्यामुळे इंग्रजी जागतिक भाषा आहे! असा खोटा प्रचार करून पालकांची दिशाभूल करत आहेत. मात्र इंग्रजी ही अमेरिका व इंग्लंड वगळता इतरत्र जास्त बोलली जात नाही. फ्रान्स, रशिया, ब्राझील, जर्मनी या राष्ट्रांनी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण देऊन आपल्या राष्ट्रांची प्रगती केलेली आहे असे सांगून एन. शिवदास यांनी कोकणी ही गोवेकरांची भाषा असून ज्याला कोकणी येत नाही तो गोवेकर नव्हे! असे प्रतिपादन केले. गोव्यातील शिक्षणाचे माध्यम बदलून ते इंग्रजी करण्याचा प्रयत्न झाल्यास समस्त कोकणीप्रेमी या निर्णयाविरुद्ध तीव्र लढा उभारतील असा इशारा त्यांनी दिला.
Monday, 21 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Great news........
Post a Comment