Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 26 March 2011

फलोत्पादन महामंडळाच्या संचालकांना अखेर हटवले

पणजी, दि. २५ (विशेष प्रतिनिधी)
फलोत्पादन महामंडळाच्या अनागोंदी कारभारावर आज पुन्हा एकदा विधानसभेत चर्चा झाल्यानंतर या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना हटवून ताबा कृषी खात्याच्या संचालकांकडे देण्याची घोषणा कृषिमंत्री विश्‍वजित राणे यांनी केली. तसेच या महामंडळाचे येत्या दोन महिन्यात हिशेबतपासणी (ऑडिट) करण्याचे आश्‍वासन देताना गरज पडल्यास हे महामंडळ बरखास्त करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या आठवड्यात या महामंडळाच्या अनेक गैरकारभारांवर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व इतर आमदारांनी प्रकाश टाकला होता व कडक कारवाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने कृषिमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते, मुख्य सचिव, वित्त सचिव, कृषी सचिव यांनी या विषयी सखोल चर्चा केली. या बैठकीची फलश्रुती म्हणून व्यवस्थापकीय संचालकांना तेथून हटविण्याचा विचार निश्‍चित झाला असे विश्‍वजित राणे आज म्हणाले.
{damoYr पक्षाने दाखवून दिल्याप्रमाणे महामंडळाचा कारभार अतिशय विस्कळीत आहे, अशी कबुली कृषिमंत्र्यांनी दिली. महामंडळाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचेही त्यांनी मान्य केले. विरोधी पक्षनेत्यांनी बैठकीत दाखवून दिलेल्या अनेक त्रुटींवर विचार करून योग्य तो निर्णय घेऊ व वेळ पडल्यास हे महामंडळच बरखास्त करू असेही त्यांनी नमूद केले.
‘‘येत्या काही दिवसांत आणखी एक बैठक घेतली जाईल व त्या बैठकीत महामंडळासंबंधी पुढील मार्ग आखला जाईल. ऑडिट अहवाल येऊ द्या, मी कुणालाही पाठीशी घालणार नाही’’, असे आश्‍वासन त्यांनी सभागृहाला दिले.
आज प्रश्‍नोत्तराच्या तासाला फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी हा प्रश्‍न विचारला होता व चर्चेच्या अनुषंगाने फलोत्पादन महामंडळाच्या कारभारात ५.४० लाख रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. आकडेवारीत तरबेज असलेल्या पर्रीकरांनी हे महामंडळ कसे कामचुकार आहे त्याची उदाहरणे दिली. महामंडळाच्या गैरकारभाराचे आणखीन काही पाढे आज त्यांनी वाचले व ते ऐकताक्षणी कृषिमंत्र्यांनी वरील घोषणा केल्या.

No comments: