इन्व्हर्टरचा स्फोट होऊन निवासी इमारतीत भडका
- सव्वाकोटीची हानी
- पाच सदनिकांना झळ
- १८ बंब पाण्याचा वापर
मडगाव, दि. २२ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील निवासस्थानासमोरील सपना आर्केड या बहुमजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एका कार्यालयवजा गोदाम असलेल्या जुळ्या सदनिकेत आज भर दुपारी आग लागून सदर सदनिका संपूर्णतः खाक झाली. या आगीत वरील आणखी तीन सदनिकांना आगीची झळ पोहोचल्याने साधारण सव्वाकोटीची हानी झाली.
पोलिस व अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगावातील निवासी इमारतीत भडकलेली अशा प्रकारची ही सर्वांत भीषण आग असून ती नियंत्रणाखाली आणण्यासाठी दलाला तब्बल दीड तास झुंज द्यावी लागली. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी जातीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यावर देखरेख ठेवली. त्यासाठी मडगावबरोबरच वेर्णा, फोंडा, पणजी व कुडचडे येथील बंबांना पाचारण केले गेले व एकूण १८ बंब पाण्याचा वापर केला गेला.
मडगाव अग्निशामक दलाचा अतिरिक्त ताबा असलेले अधिकारी प्रकाश परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आर्केडमधील हिंदू फार्मसीचे बी. एम. प्रभुदेसाई यांच्या पहिल्या मजल्यावरील गोदाम तथा कार्यालय म्हणून वापरात असलेल्या जुळ्या सदनिकेतील इन्व्हर्टरमध्ये दुपारी अचानक स्फोट झाला व आग भडकली. तेथील कर्मचार्यांनी तेथे असलेले ‘फायर एक्स्टिंग्विशर’ वापरून ती विझविण्याचा प्रयत्न केला असता ते बिघडले असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पाण्याचा वापर केला. पण त्यामुळे आग आणखीन भडकली व तेथील कॉस्मेटिक ट्यूब व अन्य वस्तूंमुळे ती फैलावतच गेली.
दरम्यान, कोणीतरी पोलिसांना वर्दी दिली व त्यांनी कळविल्यावर सात मिनिटांत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते व दलाला आत शिरून तिच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य बनले होते. आगीचे ते अक्राळविक्राळ रूप पाहून अन्य भागांतून बंबांना पाचारण केले गेले. तोपर्यंत स्थानिक लोकांनी इमारतीच्या परिसरातील वाहने बाजूला काढली व अग्निशामक दलाला मदत व्हावी म्हणून वीज खात्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांची हायड्रॉलिक लिफ्ट आणून त्यातून पहिल्या व दुसर्या मजल्यावर भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले.
बी. एम. प्रभुदेसाई यांच्या कार्यालयातील काही सामान बाहेर काढण्यास सुरुवातीस तेथील कर्मचार्यांना यश आलेले असले तरी राहिलेले संपूर्ण सामान, संगणक वगैरे खाक झाले व त्यांचे सुमारे साठ लाखांचे नुकसान झाले असे सांगण्यात आले. खाक झालेल्या सामानात औषधे, रसायने व आल्कोलिक मोठ्या प्रमाणात होते.
अन्य सदनिकांना मोठी झळ
या आगीची मोठी झळ त्या सदनिकेवरील संदीप वैद्य, रमेश होडारकर व व्ही. एम. शेट यांच्या सदनिकांनाही बसली व त्या काळवंडून गेल्या. तसेच आतील फर्निचर व अन्य सामान निकामी झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल दीड तास लागला व मोहिमेची संपूर्ण जबाबदारी विभागीय अधिकारी प्रकाश परब यांनी सांभाळली.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाला पाण्याचा पुरवठा सतत होत राहिला असता तर नुकसानीचे प्रमाण बरेच कमी राहिले असते. पण इमारतीभोवतालच्या रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे बंब त्वरित आणणे शक्य झाले नाही. सदर इमारतीत आतमध्ये बंब नेणेही शक्य नव्हते. त्यामुळे मदतकार्यांत अडथळा आला शेवटी हायड्रॉलिक लिफ्टमुळे ती समस्या दूर झाली. तोपर्यंत पोलिसांनी येऊन इमारतीभोवती कडे केले व बघ्यांना हटविले होते.
आपत्कालीन यंत्रणा निष्प्रभ!
या एकंदर प्रक्रियेत जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा मात्र कुचकामी ठरल्याचेच पुन्हा एकदा दिसून आले. या यंत्रणेच्या मासिक बैठकांत मोठमोठ्या चर्चा होतात; पण आजच्या दुर्घटनेनंतर पुन्हा या यंत्रणेचे अपयश ठळकपणे दिसून आले. सदर इमारतीच्या परिसरात तीन विहिरी असूनही पंपांअभावी त्या पाण्याचा वापर करता आला नाही. अग्निशामक दलाने सरकारकडे शहरात जागोजागी फायर हायड्रंटस् बसविण्याच्या केलेल्या शिफारशीची अजूनही न झालेली कार्यवाही किती भयानक ठरू शकते हेही आजच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांना विचारले असता फायर हायड्रंटस्चा प्रस्ताव सरकारकडे पडून असल्याचे त्यांनी सांगितले.
आगींतील नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालले होते.
Wednesday, 23 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment