Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 22 March 2011

क्रीडामंत्री बाबू आजगावकरांच्या बेछूट आरोपांमुळे विधानसभेत ‘शिमगा’!

पर्रीकरांचा रुद्रावतार - बाबूंची जाहीर माफी
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
प्रश्‍नोत्तर तासावेळच्या चर्चेदरम्यान गोवा विधानसभेत आज क्रीडामंत्री बाबू ऊर्फ मनोहर आजगावकर आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक धुमश्‍चक्री होऊन प्रकरण हातघाईवर आल्याने सभागृहातील वातावरण बराच काळ तणावपूर्ण बनले.त्यामुळे सभापती प्रतापसिंह राणे यांना सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापतींनी या प्रकरणी मध्यस्थी केली व अखेरीस क्रीडामंत्र्यांवर सभागृहाची जाहीर माफी मागण्याची नामुष्की ओढवली.
क्रीडामंत्र्यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. सभापती प्रतापसिंह राणे यांनी कामकाजातून ते काढून टाकले तरीही आजगावकरांनी आपला हेका कायम ठेवल्याने शेवटी पर्रीकर खवळले. यावेळी झालेल्या गोंधळात सर्व विरोधी सदस्य व सत्ताधारी गटाचे मंत्री सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरल्याने त्यांना पांगवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदारही तेथे दाखल झाले. त्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण लागले व ते अगदी हातघाईपर्यंत पोचले. गोवा राज्य विधानसभेच्या इतिहासात सभागृहातील परिस्थिती हातघाईपर्यंत येण्याची गेल्या अनेक वर्षांनंतरची ही दुसरी वेळ असल्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. विरोधकांनी धारण केलेला रुद्रावतार पाहून अखेरीस सभापती प्रतापसिंह राणे यांना सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांप्रकरणी विरोधकांनी केलेल्या घणाघाती आरोपांच्या फैरींनी वैफल्यग्रस्त बनलेल्या क्रीडामंत्र्यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर आयनॉक्स बांधकामप्रकरणी भ्रष्टाचाराचे तथ्यहीन आरोप करणे सुरू केले. सदस्यांच्या कात्रीत सापडलेल्या क्रीडामंत्र्यांना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी विरोधकांवर हवेतच वार करायला प्रारंभ केला. यामुळे बराच वेळ स्वतःवर संयम ठेवलेले पर्रीकर खवळले. संतापलेल्या पर्रीकरांसह विरोधी सदस्यांची आजगावकरांशी आरंभी शाब्दिक चकमक झडली. साहजिकच सभागृहातील वातावरण कमालीचे तप्त झाले. क्रीडामंत्र्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी रुद्रावतार धारण करताच विरोधकांनीही ठोशास ठोशाने उत्तर देण्याची तयारी ठेवली. क्रीडामंत्र्यांनी केलेल्या आरोपांबद्दल त्यांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी, अन्यथा पुढील कामकाज होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी यावेळी घेतला. तरीही क्रीडामंत्री गुर्मीत असल्याचे पाहून विरोधकांनी हौदा गाठला. त्यामुळे मोठाच गोंधळ निर्माण झाला.
सभागृहात विरोधकांच्या पुरवणी प्रश्‍नांना उत्तरे देताना आजगावकरांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही व विरोधकांच्या प्रश्‍नांनाही त्यांच्याकडून नीट उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे क्रीडामंत्र्यांच्या खात्यांचे प्रश्‍न असले की, विरोधक व आजगावकर यांच्यातील धुमश्‍चक्री ही तशी नेहमीचीच. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. आजगावकर यांनी आपल्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले ते त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान पर्रीकरांनी क्रीडामंत्र्यांना दिले. या दरम्यान सभापतीसमोरील मोकळ्या हौदात धाव घेतलेल्या वरोधी सदस्यांनीक्रीडामंत्र्यांचा जोरदार निषेध केला व याप्रकरणी त्यांनी माफी मागावी या मागणीचा पुनरुच्चार केला.
आपण सत्ताधारी गटाचे सदस्य आहोत व त्यातही मंत्री आहोत याचा कोणताही मुलाहिजा न बाळगता क्रीडामंत्री आजगावकरही मोकळ्या हौद्यात उतरत विरोधकांवर चाल करून आल्यामुळे वातावरण हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. कामकाज तहकूब केल्यानंतरमधल्या काळात सभापतींनी मुख्यमंत्री, क्रीडामंत्री व विरोधी पक्षनेत्यांना आपल्या कक्षात बोलवून केलेल्या मध्यस्थीप्रसंगी आजगावकर यांनी माफी मागितल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा जळजळीत इशारा पर्रीकरांनी दिला. अखेर दुपारी सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच सभापतींनी प्रश्‍नोत्तर तासाला घडलेल्या प्रकार खेदजनक होता असे स्पष्ट केले. गेल्या चार वर्षांत असा प्रकार घडला नव्हता. सभागृह हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे व येथे राज्याच्या हितासाठी पोषक अशीच चर्चा व्हायला हवी. गोवा विधानसभा देशात सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. तिला काळिमा लागेल अशा गोष्टी सभागृहात होता कामा नयेत. ज्यांना भांडायचे आहे त्यांनी खुशाल रस्त्यावर भांडावे, अशी सक्त ताकीद क्रीडामंत्री आजगावकर यांना उद्देशून दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, अशी तंबीही सभापतींनी दिली.
सभापतींच्या आदेशानंतर वरमलेल्या क्रीडामंत्री आजगावकर यांनी शेवटी सभागृहाची जाहीर माफी मागताना ‘प्रश्‍नोत्तर तासावेळी माझ्या कडून जे आरोप झाले त्यात माझी चूक झाली; त्यामुळे सभागृहाची मी क्षमा मागतो,’ अशा शब्दांत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यावेळी सभागृहात कमालीची शांतता होती.
दरम्यान, विरोधी पक्षनेते पर्रीकर यांनीही क्रीडामंत्र्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांमुळे मला हौद्यात उतरणे भाग पडले. यापुढे मीही त्याबद्दल काळजी घेईन असे स्वतःहून सभापतींना सांगत आपल्यातील राजकीय परिपक्वतेचे दर्शन सभागृहाला घडवले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त केला व गेल्या तीन वर्षांत सरकार व विरोधकांमध्ये मतभेद असूनही सभागृहाची आम्ही शान राखल्याचे ते म्हणाले.

विरोधकांचे मुद्दे काय होते?
आमदार महादेव नाईक यांचा प्रश्‍नोत्तर तासाला पहिलाच प्रश्‍न होता. त्यावर तब्बल पाऊण तास गरमागरम चर्चा झाली. विरोधी पक्षनेते पर्रीकरांसह आमदार नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, विजय पै खोत, दामोदर नाईक व सत्ताधारी गटाचे दयानंद नार्वेकर या सार्‍यांनीच क्रीडामंत्री आजगावकर यांच्यावर उपप्रश्‍नांची सरबत्ती करत त्यांना सभागृहात पळता भुई थोडी करून टाकली. क्रीडामंत्र्यांनी गोव्याच्या खेळाडूंच्या विकासासाठी सवलती व साधनसुविधा जरूर पुरवाव्यात. त्याला आमचे सहकार्य व पाठिंबा आहे. राष्ट्रीय स्पर्धांसाठी साधनसुविधा उभारण्यासाठी निधीही वापरावा. त्याला आमची हरकत नाही. तथापि, या स्पर्धांच्या नावाखाली खाजगी व सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) क्रीडामंत्र्यांनी पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा जो घाट घातला आहे त्याला आमचा तीव्र विरोध असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले.
क्रीडामंत्री आजगावकर मांद्रे व हरमल किनारपट्टीवर पाचशे कोटी रुपये खर्चाचे जे पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा घाट आहे त्या प्रकल्पाचा स्पर्धांशी व क्रीडाक्षेत्राशी काय संबंध आहे त्याचे मंत्र्यांनी सभागृहात स्पष्टीकरण करावे, अशी जोरदार मागणी पर्रीकर यांनी केली. त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देताना नार्वेकर यांनी, या स्पर्धांसाठी शाळकरी मुले येतात. त्यांना तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार का असा संतप्त सवाल केला. विजय पै खोत यांनी या स्पर्धांच्या निमित्ताने राज्यभरातील क्रीडा मैदानांचा विकास करण्याची मागणी केली.
क्रीडा खात्याने ‘पीपीपी’ तत्त्वावर हॉटेल प्रकल्प उभारण्याचे कंत्राट कधीपासून घेतले, असा सवाल करीत पर्यटन खात्याचे काम तुम्ही कधीपासून करू लागला असा टोला पर्रीकर यांनी हाणला. क्रीडा स्पर्धांच्या साधन सुविधांसाठीचा एकूण सोळाशे ब्याण्णव्व कोटींच्या अंदाजित खर्चातील ४५८ कोटी हे केवळ क्रीडा स्पर्धांशी संबंधित सुविधा उभारण्याच्या कामासाठी असल्याचे पर्रीकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पणजीत कांपाल परिसरात तब्बल तेवीस हॉटेल्स असून तेथे खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. असे असतानाही तेथे ५० कोटींचे आंतरराष्ट्रीय फूडपार्क सरकार उभारू पाहत आहे, हा काय प्रकार आहे अशी विचारणा पर्रीकरांनी केली. तेथे आधीच पार्किंग व इतर सुविधांचे तीनतेरा वाजलेले असून तेथे आणखी बजबजपुरी कसली माजवता, असा सवालही पर्रीकर यांनी केला.
केंद्र सरकारकडून जो २२२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे त्यांपैकी केवळ ७५ कोटी सरकारला मिळाले आहेत. उर्वरित निधीच्या मंजुरीचे पत्र सरकारला कधी मिळणार, या आमदार महादेव नाईक यांच्या प्रश्‍नावर क्रीडामंत्री निरुत्तर झाले. राज्य सरकारने तर नव्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय स्पर्धांसाठी केवळ आठ कोटींची तरतूद केल्याचे सांगून ‘पीपीपी’ प्रकल्प हे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप पर्रीकरांनी केला. क्रीडा खात्याला ‘पीपीपी’वर प्रकल्प उभारण्याचा अधिकारच पोहोचत नसल्याचे पर्रींकरांनी निक्षून सांगितले. क्रीडा खाते या एकंदर प्रकरणात पुरते संभ्रमात असून ‘पीपीपी’ प्रकल्पाव्दारे गोवा लुटण्याचा घाट असल्याचा आरोप पर्रीकर व पार्सेकर यांनी केला.

No comments: