सोनिया-बाळासाहेब यांच्या हस्तक्षेपाने वाद मिटला?
मात्र प्रसाद अडचणीत
मुंबई, दि. ११ : अमिताभ बच्चन यांचा माफीनामा मंजूर करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांच्या चित्रपट प्रदर्शनावर घातलेली बंदी आज मागे घेतली. जया बच्चन यांनी यापुढे तरी अशा विषयांच्या फंदात न पडता लिहून दिले असतील तेवढेच डायलॉग बोलावेत, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी अंतःकरणपूर्व मराठी जनतेकडे क्षमायाचना केल्यामुळे आणि राज ठाकरे यांनी प्रकरण चिघळू न देता बच्चन कुटुंबीयांच्या चित्रपटावरील बहिष्कार मागे घेतल्यामुळे हा वाद तात्पुरता आणि तेवढ्यापुरता मिटला असला तरी त्या निमित्ताने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन परस्परविरुद्ध व्यक्तींनी हा वाद मिटवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे विश्वसनीयरित्या लक्षात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या भित्तीचित्रांची नासधूस करुन द लास्ट लियर या चित्रपटाचा प्रसिद्धीपूर्व खेळ होऊ न दिल्यामुळे आश्चर्य म्हणजे सोनिया गांधी चितेत पडून त्यांनी मार्गारेट अल्वा यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची गहनता जाणून घेण्यास सांगितले. त्यानुसार अल्वा यांनी विलासरावांना, - मॅडम काळजीत आहेत, प्रकरण लवकरात लवकर मिटले पाहिजे- असा निरोप दिला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ यांचा संवाद होऊन अमिताभने अत्यंत प्रामाणिकपणे माफी मागण्याचे ठरले. अमिताभ कोणताही आडपडदा न ठेवता इतक्या विस्तृतपणणे क्षमायाचना करेल की बहिष्कार मागे न घेण्याचे कोणतेही कारण उरणार नाही असा निरोप मातोश्रीवरुन राज ठाकरे यांच्यापर्यंत गेला.
मंत्रालयातून सूचना गेल्यावर राज ठाकरे यांना पोलीस आयुक्तांनी वार्ताहर परिषद घेण्याची मोकळीक दिली. राज यांनी बहिष्कार उठविल्याची घोषणा केली. जया बच्चन यांनीच कॅमेरासमोर येऊन माफी मागितली पाहिजे अशी अट असताना आणि त्यांनी माफी मागितली नसताना राजनी आंदोलन मागे का घेतले अशी पृच्छा वार्ताहरांनी मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांना केली असता त्यांनी सांगितले की, जया बच्चन यांनीच माफी मागितली पाहिजे याचा अर्थ त्यांच्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीने माफी मागून चालणार नाही. अमिताभ बच्चन हे परिस्थितीचे आकलन वगैरे विषयात आणि एकंदरीतच जयाबाईंपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असल्यामुळे आणि ते बच्चन कुटुंबीयांचे प्रमुख असल्यामुळे त्यांनी इतक्या नम्रपणे माफी मागितल्यावर मूळ अटीला चिकटून बसणे सभ्यपणाचे झाले नसते. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांना आपण महाराष्ट्राकडून केवढ्या मोठ्या प्रमाणात उपकृत झालो आहोत आणि महाराष्ट्राविषयी कोणताही विकल्प आपल्या मनात कधीही येणे शक्य नाही हे इतक्या सविस्तरपणे सांगावे लागले आहे की, हा त्रास आपल्यामुळे आपल्या नवऱ्याला झाला याची लाज जयाबाईंना वाटली पाहिजे. बहिष्कार मागे घेण्याचे आमचे धोरण पूर्णपणे सुसंगत आहे. हेतू साध्य झाल्यावर संघर्ष संपतो.
महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका लवकरच होणार असून त्यात मुंबईतील हिंदी भाषिकांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी जया बच्चन यांना मुलायमसिंग वापरीत आहेत आणि हा वाद कॉंग्रेसला परवडणारा नाही. असा सांगावा मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना दिल्लीहून मिळाला आहे. सोनियाजी आणि अमिताभजी यांची प्रत्यक्ष भेट नजिकच्या भविष्यकाळात होईल वा न होईल परंतु दुरावा संपविण्याची कॉंग्रेस अध्यक्षांना इच्छा आहे आणि बच्चन कुटुंबीय मुलायमसिंग यांच्या कारस्थानांपासून दूर राहिले पाहिजे यासाठी त्यांच्याशी सौहार्दपूर्णक संपर्क ठेवण्याच्या सूचना मुंबई कॉंग्रेसला मिळाल्या आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त एल. के. प्रसाद यांचे -यह सिटी किसी बाप की नही है- हे राज ठाकरे यांना उद्देशून केलेले विधान वास्तविक सर्व मराठी जनतेला उद्देशून केले आहे असा अर्थ घेतला जाऊ शकतो आणि तसे झाल्यास आगामी निवडणुकीत हे वाक्य मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात कॉंग्रेसची धुळधाण करु शकते, याकडे राजकीय निरीक्षकांनी तसेच दिल्लीतील कॉंग्रेसच्या मराठी पुढाऱ्यांनी सोनिया गांधींचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे प्रसाद यांनी हे विधान करताना अप्रासंगिकता, आयपीएस आचारसंहितेचे उल्लंघन आणि कळत नकळत शांतताभंग करण्याचा प्रयत्न यापैकी काही प्रमाद केले आहेत का याची चौकशी केली गेली पाहिजे असे अनौपचारिकरित्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आले आहे.
दिल्लीच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे हा जो समज मराठी माणसाच्या मनात बद्धमूल आहे तो खरा आहे असे प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन वाटू शकते. त्यामुळे प्रसाद ज्या उद्धटपणे मराठी माणसाचा बाप काढतात ती पद्धत महाराष्ट्र शासनाला आणि कॉंग्रेसला लाभदायक नाही, असे मत मुंबईच्या अनेक सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी खाजगीमध्ये गृहमंत्रालयाकडे व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रसाद यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
Thursday, 11 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment