पणजी,दि.९ (प्रतिनिधी): सांगे येथील बेकायदा खाणींबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेले स्पष्टीकरण ही निव्वळ धूळफेक आहे. या महाघोटाळ्यात खाण खात्याचे संचालक जे.बी.भिंगी हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित असून या प्रकरणाला अभय देणारे मुख्यमंत्री व खाणमंत्री या नात्याने कामतही तेवढेच जबाबदार आहेत. या घोटाळ्यावर कारवाई न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा विरोक्षी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज दिला.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. सांगे येथील इमिलिया फ्रिग्रेदो यांच्या मालकीची खाण इम्रान खान नामक एका व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे प्रकरण विधानसभेत उघड केल्यानंतर मुख्यमंत्री कामत यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी वाच्यता न करता अहवालरूपी दोन कागदाचे तुकडे विधानसभा पटलावर ठेवले. हा अहवाल प्रत्यक्षात पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी निव्वळ धूळफेक असल्याची टीका पर्रीकर यांनी केली. मुळात या घोटाळ्यात सामील असलेल्या लोकांकडूनच हे स्पष्टीकरण तयार करण्यात आल्याची टीका करून या घोटाळ्यास खाण संचालक श्री.भिंगी व मुख्यमंत्री कामत हे भागीदार ठरत असल्याने त्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा सनसनाटी आरोपही पर्रीकर यांनी केला. याप्रकरणी जर येत्या दिवसांत सरकारने काहीही कारवाई केली नाही तर सर्वोच्च न्यायालयात या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे सादर केली जातील,असा इशाराही त्यांनी दिला. खाण उद्योगाकडून सरकारी तिजोरीत जमा होणाऱ्या "रॉयल्टी'त ही मोठ्याप्रमाणात तफावत असल्याचे ते म्हणाले. सरकारला "रॉयल्टी' च्या रूपात येणारे सुमारे २५ ते ३० कोटी रूपये नुकसान झाल्याचा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.
सर्व कागदोपत्री पुरावे सादर करूनही जेव्हा खाणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री कामत याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याने त्यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण होणे स्वाभाविक आहे,असेही पर्रीकर म्हणाले. त्यांनी या बेकायदा गोष्टींवर प्रत्यक्ष कृती करूनच आपल्यावरील या संशयाचे वावटळ दूर करावे,असेही ते म्हणाले.
----------------------------------------------------------
बेकायदा खाण उद्योगात किमान दहा कॉंग्रेस नेते
विद्यमान कॉंग्रेस पक्षातील किमान दहा नेते बेकायदा खाण उद्योगात सहभागी असल्याचा सनसनाटी आरोप पर्रीकर यांनी केला.राज्यात कायदेशीर खाण उद्योग हा केवळ एक छोटा अंश आहे व त्याला हरकत घेण्याचे कारण नाही परंतु बेकायदा खाण उद्योगाला उधाणच आले असून त्यात प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाचे नेतेच सहभागी असल्याने सरकारकडून कारवाईची अपेक्षा काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment