Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 9 September 2008

सर्व मागण्या मार्गी लावणार: मोन्सेरात

शिक्षकांवर घोषणांचा पाऊस
पणजी, दि.९ (प्रतिनिधी): शिक्षकी पेशात २४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना सिलेक्शन श्रेणी लागू करणे, उच्च माध्यमिक विद्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यावसायिक विभागातील शिक्षकांना कायम करणे, शालेय स्तरावर तात्पुरत्या पद्धतीने काम करणाऱ्या संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेणे व तत्पूर्वी त्यांच्या मानधनात त्वरित वाढ करणे, शिक्षकांना लॅपटॉप अशा घोषणांची खैरात आज शिक्षणमंत्री आतानासियो मोन्सेरात यांनी ४७ व्या शिक्षक दिनानिमित्त कला अकादमीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात केली.
राज्यातील शासकीय व बिगर शासकीय शाळांतील वेतन, अभ्यासक्रमातील तफावती व इतर गैरव्यवहार या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर त्या योग्य रुळावर आणण्याच्या दृष्टीने शैक्षणिक आयोग स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. कला अकादमीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शिक्षण सचिव उद्दिप्त रे व शिक्षण संचालक सेल्सा पिंटो तसेच राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षक हा जीवनाला वळण देणारा महत्त्वाचा घटक असतो.आज ज्या शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्यांचे आभार मानताना त्यांनी सज्ञान,भावी पिढी निर्माण करण्यासाठी दिलेले योगदान खरेच अनमोल असल्याचे श्री. मोन्सेरात पुढे म्हणाले.
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श असतो, शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व जीवन म्हणजेच एक शिक्षण आहे व केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन केवळ ज्ञानी बनत नसून अनुभवाने मनुष्य शहाणा बनतो. शाळा ही केवळ चार भिंती पुरती मर्यादित न राहता ती ज्ञानाचे खुले दार असले पाहिजे व शिक्षक हा ताणमुक्त व आनंदीत असला पाहिजे या बाबी शिक्षणमंत्री बनल्यानंतर विविध शिक्षण तज्ज्ञांसोबत झालेल्या चर्चेनंतर माझ्या लक्षात आल्या असून शिक्षकांची सर्व गाऱ्हाणी व मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी कार्यरत राहणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
राज्यात शिक्षण सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचविणे, माहिती तंत्रज्ञानाद्वारे ज्ञान मिळविण्यास प्राधान्यक्रम, तिसरी इयत्तेपासून संगणक साक्षरता, ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण कठीण जाते अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्यात व्यावसायिक कोर्स सुरू करणे तसेच विकलांग व खास विद्यार्थ्यांसाठी खास योजना आखणे ही आपली दूरदृष्टी असल्याचे श्री. मोन्सेरात यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी प्राथमिक विभागातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीमती इंद्रसेना शिरोडकर (स.प्रा.वि. मडकईवाडा पिळर्ण बार्देश), श्रीमती जयश्री जे.कामत( स.प्रा.वि. बोर्डा, मडगाव), माध्यमिक विभागात शेख नरुद्दीन ए. शेख(साहाय्यक शिक्षक सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे सत्तरी), व एलीयास रॉड्रीग्स(मुख्याध्यापक, सेंट रिटा उच्च माध्यमिक विद्यालय ,मायणा कुडतरी),व श्री. सदानंद हिंदे (श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय,पर्ये सत्तरी) यांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी शिक्षक दिनानिमित्त सर्वांत जास्त निधी जमविल्याबद्दल डिचोली, सासष्टी व मुरगाव तालुका भागशिक्षणाधिकारी कार्यालयास शिक्षण सचिवांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षण सचिव उद्दिप्त रे यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात डी.आय.ई.टी.च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थना व स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिक्षण संचालक सेल्सा पिंटो यांनी स्वागत केले. साहाय्यक संचालक के. के. नाडकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुशीला देसाई यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------------------------
'मी त्यापैकी नव्हे'
शिक्षणमंत्री श्री.आतानासियो मोन्सेरात यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात बोलताना माजी शिक्षणमंत्र्यांवर तोंडसुख घेतले व उपस्थित शिक्षक वर्गाकडून जोरदार टाळ्या मिळविल्या. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षकांच्या बऱ्याच मागण्या व गाऱ्हाणी गेल्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याचे सांगताना अनेक शिक्षणमंत्री झाले व त्यांनी फक्त आश्वासनेच दिली पण ते मागण्या व गाऱ्हाणी मान्य करण्यास कुचकामी ठरल्याचे सांगितले. या यादीत मला समाविष्ट करू नका, मी या मागण्या मान्य करण्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी सांगितल्यावर उपस्थितांकडून टाळ्यांच्या गडगडाटात त्यांच्या विधानाचे स्वागत झाले.

No comments: