Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 September 2008

मनोरंजन संस्थेला यंदा 'इफ्फी'त झुकते माप

पणजी, दि. १०(प्रतिनिधी) : यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी ०८) आयोजनात गोवा मनोरंजन संस्थेला जादा प्रतिनिधित्व देण्यास केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.
आज येथील मॅकनिझ पॅलेस येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या दिल्ली दौऱ्यावेळी गेल्या सोमवार ८ सप्टेंबर रोजी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालिका नीलम कपूर, केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव, गोव्याचे मुख्य सचिव जे.पी. सिंग व गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव हजर होते. यावेळी झालेल्या चर्चेत एकूण तीन विभागांची जबाबदारी गोवा मनोरंजन संस्थेकडे देण्याबाबत अखेर एकमत झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
"इंडियन प्रीमियम',"कंट्री फोकस'व "रिट्रोस्पेक्टीव्ह' यांची जबाबदारी गोव्याकडे असेल. चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी व तिकिटांकरिता वापरण्यात येणारी "टेडाकॉल'सॉफ्टवेअर' यंदाही वापरण्यास मंजुरी मिळाली आहे. याप्रकरणी आवश्यक करारात गरजेनुसारबदल केल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत "इफ्फी'संदर्भातील सामंजस्य करारावर सह्या होणार असल्याचे सांगण्यात आले.
या महोत्सवानिमित्ताने गोवा मनोरंजन संस्थेतर्फे "शॉर्ट फिल्म कॉर्नर' ही अनोखी स्पर्धा आयोजिली जाणार असून चित्रपट निर्मितीत गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन देणे हा त्यामागील हेतू आहे.

No comments: