Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 11 September 2008

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्यापासून बंगळूरमध्ये

लोकसभा, विधानसभा, निवडणुकांवर चर्चा
नव्या धोरणांची आखणी, अणुकरारावरही चर्चेचे संकेत

बंगळूर, दि.११ : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार १३ सप्टेंबरपासून बंगळूर येथे सुरू होत असून तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत आगामी काही महिन्यात होणाऱ्या तीन राज्यातील विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकांविषयी धोरणांची आखणी होणार असल्याचे वृत्त आहे.
गुजरात, कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर भाजपा अतिशय उत्साहात असून तितक्याच योजनाबद्ध पद्धतीने पक्षाने लोकसभेचीही तयारी सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून केंद्रात सत्ताबदलाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. त्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील असून लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आपल्या वाटचालीस सुरुवात केली आहे.
लोकसभा तयारीच्या बाबतीत सर्वप्रथम सुरुवात करणाऱ्या भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यातही अन्य पक्षांच्या तुलनेत बाजी मारली आहे. सर्वप्रथम भाजपच्या उमेदवारांचीच यादी जाहीर झाली होती. २००४ च्या निवडणुकीतील पराभवानंतर सावरून तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेले यश कॉंग्रेस आणि अन्य पक्षांचे डोळे दिपविणारेच ठरले आहे. मागील निवडणुकीतील काही चुकाही आता सुधारण्याचे पक्षाने ठरविले आहे.
भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी बंगलोरचीच निवड का केली, असे विचारले असता पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, कर्नाटकच्या माध्यमातूनच आमचा दाक्षिणात्य राज्यांत प्रवेश झाला आहे. त्यामुळे यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बंगलोर येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीही तीन वेळा कर्नाटकमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आहे. पण, पक्षाची सत्ता येथे आल्यानंतर प्रथमच सर्व राष्ट्रीय स्तरावरील नेते येथे एकत्र येणार आहेत.
या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची रणनीती निश्चित होणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असल्याने त्यांना अधिक प्रयत्नपूर्व ही राज्ये आपल्याकडेच राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवे सहकारी पक्ष जोडणे आणि जुन्या पण, सोडून गेलेल्या सहकारी पक्षांना परत आणणे यासाठी पक्षाचे कार्य सुरू झाले आहे. त्यातही दाक्षिणात्य राजकारणात नवा झंझावात ठरलेल्या चिरंजीवीच्या नव्या पक्षाशी भाजपाची जवळीक पाहून कॉंग्रेसची झोप उडाली आहे. या पक्षांची युती कॉंग्रेसकरिता मोठा धक्का ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमांपासून दुरावलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. पण, ते बैठकीसाठी मागील वर्षीप्रमाणे आपला संदेश पाठविणार असल्याचे समजते. पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी "विजय संकल्प रॅली'मुळे कदाचित पूर्णवेळ या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. पण, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री मात्र यावेळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

No comments: