मडगाव, दि.६ (प्रतिनिधी): मडगावातील दुकाने व घरे फोडून ऐवज पळविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असून अशा घटनांचे आता कोणालाच गांभीर्य राहिलेले नसल्याचे दिसून येत आहे. आज मुरीडा फातोर्डा येथे एका घराच्या खिडकीचे ग्रील्स कापून चोरट्यांनी साधारण लाखभराचा ऐवज पळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, पोलिसांना अजून कोणताच धागादोरा हाती लागलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे बाथरूमच्या खिडकीचे ग्रील्स कापून आबादे फारीया रस्त्यावरील एका घरातून चोरट्यांनी १.८० लाखांचा ऐवज पळविला होता. त्या चोरीचा कोणताही छडा लागण्यापूर्वीच ही दुसरी चोरी झाल्यामुळे एकाच टोळीचे ते काम असावे, असा कयास व्यक्त केला जात आहे.
मुरीडा येथील प्रदीप जाधव यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील्स कापून चोरटे आत घुसले. चोरट्यांनी एक लॅपटॅाप, सोन्याच्या वस्तू व काही रोकड मिळून लाखभराचा ऐवज लंपास केल्याची तक्रार जाधव यांनी नोंदविली आहे.
या दिवसात दुकाने फोडण्याचे प्रकार कमी झालेले असून त्या ऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा बंद असलेल्या घरांकडे वळविल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान काल सकाळी वजरो - राय येथे पोलिस असल्याची बतावणी करून एका कष्टकरी महिलेकडील साधारणपणे ७६ हजारांचे दागिने पळविण्याचा जो प्रकार घडला त्या प्रकरणाचा कोणताच तपास लागू शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयित स्थानिक असावेत असा कयासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Sunday, 7 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment