Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 7 September 2008

आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष

इस्लामाबाद, दि. ६ : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना २८१ मते मिळालीत, तर त्यांच्या विरोधात असलेल्या सैयदुजम्मा यांना १११ मते मिळालीत.
मुशहीद हुसेन या तिसऱ्या उमेदवाराला ३४ मते मिळाली आहेत. तसे या निवडणुकीचे समीकरण पूर्वीपासूनच झरदारी यांच्या बाजूने होते. पण, सुरक्षेच्या कारणांमुळे ते खुलेआमपणे प्रचारासाठी फिरू शकत नव्हते. याउलट अन्य दोन उमेदवारांनी खुलेआम फिरून जोरदार प्रचार केला. सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडल्यानंतर या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या "पीएमएल-एन'च्या उमेदवाराकडून सुद्धा तसा झरदारी यांना धोका नव्हता.
एकूण मतांपैकी ६० टक्के मते आपल्याला मिळतील, असा झरदारी यांचा दावा होता. महाभियोगाच्या भीतीने परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याचवेळी या पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. झरदारी यांना अनेक लहान पक्षांचा सुद्धा पाठिंबा मिळाला होता. मुताहिदा कौमी मुव्हमेंट, अवामी नॅशनल पार्टी, जमायत उलेमा-ए-इस्लाम तसेच पाकिस्तान मुस्लिम लीगच्या काही बंडखोरांनी झरदारी यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्राध्यक्षांचे अधिकार मर्यादित केले जातील आणि तालिबान बंडखोरांना मात दिली जाईल, अशी घोषणा झरदारी यांनी निवडणुकीपूर्वीच केली होती. या निवडणुकीत सिनेटच्या १००, नॅशनल असेंब्लीतील ३४२ आणि प्रांतिक सभागृहातील ६५ सदस्यांनी भाग घेतला.

No comments: