पणजी,दि.१०(प्रतिनिधी) : गोव्याला विशेष दर्जा का मिळायला हवा, याबाबत निश्चित स्वरूपाचा अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्य सचिव जे.पी.सिंग यांना देण्यात आले आहेत. दिल्लीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेल्यानंतर या संपूर्ण अहवालाचे सादरीकरण पंतप्रधानासमोर केले जाईल व या दर्जाची पात्रता सिद्ध केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.
प्रामुख्याने विदेशींना गोव्यात जमिनी खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी गेल्या विधानसभा अधिवेशनात गोव्याला विशेष दर्जा देण्याबाबत भाजपचे उपनेते व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा व कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मांडलेला संयुक्त ठराव एकमताने संमत केला होता. हा ठराव मंजूर केल्यानंतर आता ही मागणी धसास लावण्यासाठी सरकारने काय केले आहे, असा सवाल केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
राज्याला विशेष दर्जा मिळावा ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु हा दर्जा कशा पद्धतीचा हवा व तो राज्याला का मिळायला हवा आदी मुद्दे केंद्राला पटवून देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे उगाच घाई न करता पूर्ण अभ्यास करूनच हा विषय हाताळला जाईल,असेही त्यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment