पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : तुरुंगातून "पॅरोल'वर बाहेर गेलेले आणि त्यानंतर फरार झालेले कैदी विमानाचे तिकीट काढून गोव्यात येऊन तुम्हाला शरण येतील अशी अपेक्षा आहे का, असा प्रश्न करून या फरार कैद्यांना शोधण्यासाठी गेलेले पोलिस पथक सध्या कोणत्या राज्यात आहेत याची उद्या दि. ९ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण माहिती देण्याचा आदेश आज मुंबई न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिली. याची माहिती उद्या सकाळपर्यंत न मिळाल्यास त्याचे गंभीर परिणाम तुरुंग महानिरीक्षकांना भोगावे लागणार असल्याचे सांगत तुरुंग महानिरीक्षकांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे न्यायमूर्तींनी तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले.
पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांचा शोध घेण्यासाठी काय-काय करण्यात आले, याचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश यापूर्वी न्यायालयाने दिला होता. त्यानुसार याविषयाची अहवाल सादर करण्यात आला. पॅरोलवर गेलेले तेरा कैदी सध्या फरार असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. एक कैदी श्रीनगर येथील मनोविकार उपचार इस्पितळात उपचार घेत आहे, तर एकाने देश सोडल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तुम्हाला ही माहिती उपलब्ध असताना इस्पितळात दाखल असलेल्या कैद्याला अद्याप कशाला ताब्यात घेण्यात आले नाही, असा प्रश्न करून तो कोणत्या इस्पितळात आणि कशा प्रकारचा उपचार घेत आहे, याचा तपशील न्यायालयात सादर करण्याचाही आदेश यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला कैदी देश सोडून जात असल्याने "इमिग्रेशन' विभागाने त्याला देश सोडायला ""क्लिनचीट'' कशी दिली, असे यावेळी न्यायमूर्तींनी सरकारी वकिलांना विचारले.
पॅरोल सोडलेल्यांच्या शोधासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दर आठवड्याला देण्यात यावी, असे तुरुंग प्रशासनाला न्यायालयाने सांगितले आहे. फरार असलेले हे आरोपी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोषी ठरलेले असून सध्या ते समाजात मुक्त फिरत आहे. या आरोपींना पॅरोलवर सोडण्यासाठी एक व्यक्तीला हमीदार म्हणून ठेवले जाते. एखादा कैदी तुरुंगात परत आला नसल्यास त्या हमीदाराला एक लाखापर्यंत दंड आहे. परंतु आत्तापर्यंत अशा प्रकारची कोणत्याच हमीदारावर कारवाई केलेली नसल्याने येणाऱ्या काळात ही कारवाई केली जाणार असल्याचे असल्याचे यावेळी सरकारी वकिली विनी कुतिन्हो यांनी न्यायालयाला सांगितले. गेल्या २००३-०७ या कालावधीत पॅरोलवर सोडलेले आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment