पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत चुकीची माहिती दिल्याच्या दावा करून "ऊठ गोंयकारा' संघटनेने आज पणजी पोलिस स्थानकात त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या १८१, १९९, १७१(जी) कलमांनुसार तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप तक्रारीची नोंद झालेली नसून प्राथमिक चौकशीनंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पणजीचे पोलिस निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त यांनी दिली.
आज सकाळी "ऊठ गोंयकारा'चे प्रवक्ते ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी दाखल केलेल्या या तक्रारीबरोबर निवडणूक अर्जासोबतच जोडलेले प्रतिज्ञापत्र, मुंबई येथील सेंट तेरेझा विद्यालयात केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्याचे त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचे पत्र व सरकारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या मंत्री मोन्सेरात यांचा पूर्ण तपशीलाची एक प्रत या तक्रारीबरोबर जोडण्यात आली आहे.
प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची जबाबदारी स्वीकारून मोन्सेरात यांनी मंत्रिपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी या संघटनेने केली होती. त्यासाठी त्यांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ते दहावी उर्तीण झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुन्हा ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यास मोन्सेरात यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिस तक्रार करण्यात आल्याचे ऍड. आयरिश यांनी सांगितले. संघटना याप्रकरणी उच्च न्यायालयातही जाणार असल्याचे ते म्हणाले.
मोन्सेरात हे आठवीदेखील उर्तीण झालेले नसल्याने ते दहावी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. १९ जून १९७५ रोजी त्यांनी वांद्रे मुंबई येथील सेंट तेरेझा विद्यालयात सहावीत प्रवेश घेतल्यानंतर ७ सप्टेंबर १९७८ रोजी शाळा सोडली. त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक फा. अँथनी जोसेफ यांनी सर्व कागदपत्रे घेऊन गोव्यात यावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे. येत्या काही दिवसांत सदर मुख्याध्यापक गोव्यात येणार असल्याची माहिती यावेळी ऍड. आयरिश यांनी दिली.
--------------------------------------------------------
योग्य वेळी उत्तर देऊ: बाबूश
मंत्री म्हणून काम करण्यापासून माझी अडवणूक केली जात आहे. मात्र, मी या प्रकाराला बळी न पडता शिक्षण खात्यात आजपर्यंत जे कोणी केले नाही अशी कामगिरी करून दाखवणार आहे. वरिष्ठांनी मला याबाबत विचारणा केली तर त्यांना मी योग्य ते उत्तर देईन, असे बाबूश मोन्सेरात यांनी या तक्रारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment