Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 13 September 2008

पोलिस मुख्यालयातील टाकीतून काढले तब्बल सातशे लिटर पाणीमिश्रित पेट्रोल

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): पोलिस मुख्यालयात असलेल्या पेट्रोलच्या टाकीतून तब्बल सातशे लीटर पाणी मिश्रित पेट्रोल आज काढण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे ("आयओसी') कर्मचारी या कामाला लागले आहेत. या प्रकाराची पोलिस खात्याने गंभीर दखल घेतली असून या भेसळीचा अहवाल पोलिस वरिष्ठांना देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस तक्रार करवी की, नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे "आयओसी'चे धाबे दणाणले आहे. कालपासून कंपनीचे अधिकारी पोलिस मुख्यालयात ठाण मांडून आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती पुरवली जात नाही.
काल सकाळी वास्कोहून आलेल्या एका टॅंकरमधील पेट्रोल या २० हजार क्षमतेच्या टाकीत रिते करण्यात आले होते. त्यानंतर आठ पोलिस वाहनांत पेट्रोल भरण्यात आले. मात्र ही वाहने पोलिस मुख्यालयाच्या बाहेरही जाऊ शकली नाहीत. काही मीटर अंतरावरच ती बंद पडल्याने त्वरित आयओसीशी संपर्क साधण्यात आला.
काल सकाळी आणि आज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या टाकीला पाणी खेचण्याचा
पंप बसवून सुमारे ६९० लीटर पाणी बाहेर काढले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी बंद टाकीत कसे पोहोचले, यामागील गूढ कायम आहे. टाकीतील पेट्रोलचे वेगवेगळे नमुने चाचणीसाठी कंपनीने घेतले आहेत.
काही दिवसांपूर्वी कदंब वाहतूक महामंडळाच्या टाकीतील पाणीमिश्रित डिझेल नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येताच संशयितांना चौकशीसाठी अटक केली जाणार असल्याचे पर्वरी पोलिसांनी सांगितले. परंतु, कदंब महामंडळाला झालेल्या डिझेल पुरवठ्यात कोणत्याही प्रकारे भेसळ झाली नसल्याचा दावा "आयओसी'ने केला आहे.

No comments: