पणजी, दि.१२(प्रतिनिधी): बिहारातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १० सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४ लाख रुपये मदत गोळा केल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी दिली.
आज या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना पर्वतकर म्हणाले, येत्या १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात मदत गोळा करण्यासाठी विशेष रथ फिरवला जाणार आहे. बिहारातील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे येथील लोकांची कशी वाताहत झाली तसेच या लोकांना कोणत्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे हे लोकांना या रथाच्या माध्यमाने पटवून दिले जाणार आहे. दरम्यान, राज्यभरातून कपडे गोळा करण्यासाठी पक्षाने एकूण ९ केंद्रांची घोषणा केली आहे. त्यात प्रदेश भाजप मुख्यालय(पणजी), विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचे कार्यालय (पणजी),आशिष शिरोडकर, हॉटेल सत्यहिरा (म्हापसा),आमदार दयानंद सोपटे यांचे कार्यालय, महादेव मंदिर जवळ (पेडणे),आमदार राजेश पाटणेकर,भाजप कार्यालय (डिचोली),उदय च्यारी,कुडतरकर नगरी (फोंडा),भाजप कार्यालय, लापाझ हॉटेल मागे(वास्को),भाजप कार्यालय,लोहीया मैदानासमोर (मडगाव),भाजप कार्यालय,मंगलवन इमारत,चावडी (काणकोण)आदी ठिकाणांचा समावेश आहे. लोकांनी जुने पण वापरता येण्यालायक कपडे दान करावेत जेणेकरून येत्या रविवारी पहिला ट्रक बिहारला रवाना करता येईल,असेही पर्वतकर म्हणाले.
दरम्यान,बिहार पूरग्रस्तांना रोख मोठी रक्कम दान करायची असेल व आयकरात ज्यांना सूट मिळवायची असेल त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष,आपदा राहत कोष(खाते क्र.१६६०१०१००१७६५४५) ऍक्सिस बॅंकेच्या कृष्णानगर दिल्ली या पत्त्यावर रक्कम पाठवता येईल. उर्वरित कमी रोख रकमेसाठी प्रदेश भाजपने कॉर्पोरेशन बॅंकेत उघडलेल्या खाते क्र.एसबी-०१-०२४००२ मध्ये जमा करावी. ही रक्कम या बॅंकेच्या कुठल्याही शाखेत जमा करता येईल,असेही ते म्हणाले.
Saturday, 13 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment