Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 7 September 2008

पैंगीण येथे अपघातात गावडोंगरीचे दोन युवक ठार

काणकोण, दि. ७ (प्रतिनिधी) - गावडोंगरी येथील दोन युवक आज सकाळी पैंगीण येथे झालेल्या एका अपघातात जागीच ठार झाले.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तुडल येथील अनिल फळदेसाई व नाणे येथील जानू गांवकर आज सकाळी दहाच्या सुमारास गावडोंगरी येथून मोटारसायकल (क्र. जीए-०२, ४८४५) वरून लोलये येथे जात होते. वेलवाडा पैंगीण येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले व ते वाहन पसार झाले. मागाहून येणाऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या त्या युवकांना काणकोणच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. पण तत्पूर्वीच ते मरण पावले होते.
अपघाताचे वृत्त पसरताच काणकोण तालुक्यातील शेकडो नागरिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यात काणकोणचे आमदार विजय पै खोत, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस, गांवडोंगरीचे माजी सरपंच धिल्लन देसाई, माजी सरपंच जनार्दन भंडारी, देवेंद्र काशिनाथ नाईक व अन्य उपस्थित होते.
काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अनिल फळदेसाई यांच्या तोंडाचा चेंदामेंदा झाल्यामुळे त्याची त्वरीत ओळख पटणे अडचणीचे झाले.
नाणे येथील जानू गांवकर हा दोन वर्षांपूर्वी पंचायत सचिव म्हणून कामाला लागला होता. गावडोंगरी पंचायतीत सध्या तो कामाला होता. पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न भगत व तेरोन डिकॉस्ता यांनी मृतदेहाचा पंचनामा केला व दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठविले.
पोलिसांनी फरारी वाहनांची शोध घेण्यासाठी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यावर अपघाताची माहिती वायरलेसद्वारे कळविली आहे.
आज सकाळपासून सुरु झालेल्या पावसात भिजतच ते दोघे युवक लोलये येथे जात असताना एखाद्या अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक देऊन ते पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काणकोणचे पोलिस निरीक्षक सुरज हळर्णकर यांनी दुपारी मोखर्ड-भाटपाल येथे रस्त्याच्या बाजूला उभा असलेला पेट्रोलवाहू टॅंकर क्रमांक एमएच०४, केए ७७२८ ताब्यात घेतला असून, त्याचा अपघाताशी संबंध आहे का, याची चौकशी सुरु केली आहे.
पोळे चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करण्यासाठी बसविण्यात आलेले "व्हिडिओ कॅमेरे' नादुरुस्त असल्याची टीका माजीमंत्री इजिदोर फर्नांडिस यांनी केली आहे.
गावडोंगरी येथे सात दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवावर या अपघाताचा परिणाम झाला आहे. संपूर्ण पंचायत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. संध्याकाळी उशिरा दोघा दुर्दैवी तरुणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री गावडोंगरी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

No comments: