पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : कदंब वाहतूक महामंडळाला पाणीमिश्रित डिझेल पुरवठा झाल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क पोलिस खात्यालाच त्या प्रकारच्या डिझेलचा पुरवठा झाल्याने पोलिसांची तीन वाहने आज रस्त्यांतच बंद पडली. परिणामी दिवसभर पोलिस मुख्यालयात असलेल्या पेट्रोल पंपातील पाण्याचे अंश वेगळे करण्याचे काम सुरू होते. सदर डिझेलचा पुरवठा "आयओसी'तर्फे झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे सर्व पोलिस वाहनांत वेर्णा येथून डिझेल भरले जात आहे.
काही दिवसांपूर्वी कदंब महामंडळाच्या डेपोतील पेट्रोल पंपना पाणीमिश्रित डिझेलचा पुरवठा झाल्याने एकाच दिवशी ठिकठिकाणी १६ बसगाड्या बंद पडल्या होत्या. यावेळी त्यावेळी "कदंब'ने या कंपनीविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप या प्रकरणातील दोषी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या घटनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर डिझेलचा काळा बाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता खुद्द पोलिस खात्यालाच पाणीमिश्रित डिझेल पुरवठा झाल्याने दोषींवर कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment