Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 8 September 2008

प्रदूषणकारी उद्योगाला विरोधासाठी कालेवासीय आक्रमक, ७० अटकेत, बेकायदा पूल बांधल्याचा आंदोलकांचा आरोप

काले, दि.८ (प्रतिनिधी) : सांतोण देवनामळ काले येथील प्रदूषणकारी जैन उद्योग प्रकल्पाच्या विरोधात कालेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनात ७० जणांना अटक करण्यात आली. उपजिल्हाधिकारी वेनिसिओ फुर्तादो यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मातीच्या खाजगी रस्त्यावरील ओहोळात सिमेंटचा पूल बांधण्यात आला. यावेळी सुमारे ३०० लोकांचा जमाव जमला होता.
अटक केलेल्यांना संध्याकाळी उशिरा सोडण्यात आले. अटक केलेल्यांत मुलांसोबत ७५ वर्षांच्या वृद्धांचाही समावेश होता. यावेळी सरकारी यंत्रणा व अधिकारी मोठ्या कंपनीच्या दबावाखाली वावरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जैन उद्योग प्रकल्पाच्या विरोधात सुमारे चार वर्षापासून ग्रामस्थांचा खटला चालू असून प्रकल्पाच्या प्रदूषणातून कालेवासीयांना फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी केली आहे. कालेतील नार्वेकर खाण कंपनीतून जाणाऱ्या एका मातीच्या रस्त्यावरून जाण्यासाठी काही वर्षापूर्वी येथील लोकांनी सिमेंटचे पाईप टाकून रस्ता निर्माण केला होता. पण सदर प्रकल्पाकडून हा रस्ता अवजड मालवाहतुकीसाठी वापरण्यात येऊ लागला. गेल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने पाईप वाहून गेले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडून सिमेंटचे पाईप टाकण्याचा प्रयत्न पोलिस बंदोबस्तात करण्यात आला होता. तो फसल्याने आज केप्याचे उपजिल्हाधिकारी फुर्तादो यांच्या मार्गदर्शनाखाली सांग्याचे मामलेदार पराग नगर्सेकर, पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई, कुडचड्याचे नीलेश राणे, संतोष देसाई, रोहिदास पत्रे सीआरपी जवानांच्या तुकड्या, सा. बां. खात्याचे अधिकारी सालेलकर, व जल्मी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ग्रामस्थांना यावेळी वाहनात कोंडण्यात आले. अनेकांना यामुळे इजाही झाली. सरपंच संतोष गावकर व इतरांनी दुपारी आमदार अनिल साळगावकर येणार असून कोणालाही तोवर अटक करू नये अशी मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत ही कारवाई करण्यात आली. यानंतर या खाजगी रस्त्यावर पूल बांधण्यात आला. उपजिल्हाधिकारी फुर्तादो यांनी सांगितले की, हा पूल २४ तासांत बांधण्याचा सरकारला अधिकार असल्याने हा पूल बांधण्यात आला. याबाबत सा. बां. खात्याच्या अधिकाऱ्यांनी मात्र काहीही सांगण्यास विरोध केला. कार्यालयात याबाबत सरकारी लेखी आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सरकार ग्रामस्थांच्या विरोधात व कंपन्यांच्या आदेशानुसार वागत असल्याचे सांगितले.
आज सरकारी अधिकारी येणार असल्याचे कळताच सरपंच गावकर यांच्यासह सुमारे ३०० नागरिक विरोधासाठी जमले होते. सावर्डे काले येथील आंबेउदक ते देवनामळ पर्यंतचा मुख्य रस्ता खाण कंपनीकडे येत असल्याने मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे गावकर यांनी सांगितले. जनतेच्या विरोधात रस्ता करणे योग्य नसल्याचे गावकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही ओहोळात ठाण मांडून बसलेल्या ग्रामस्थांना अटक करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. अटक केलेल्यांना पोलिस स्थानकावर ठेवण्यात आले. सरपंच गावकर यांच्यासह इतरांनी पोलिस स्थानक गाठले. आमदार साळगावकर यांच्या वकिलांच्या साहाय्याने त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान घरातील सर्वांना अटक केल्यामुले येथील दोन घरात आज गणपतीची आरती झालीच नाही. सदर घरात सात दिवस व नऊ दिवस गणपती आहे.
याच भागातील कुड्डेगाळ फोमेंतो खाण कंपनीच्या गणेशोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत उपस्थित राहणार होते. पण येथील वातावरण तंग बनल्याने त्यांनी या कार्यक्रमाला गैरहजर राहणे पसंत केले.
या घडलेल्या प्रकाराने काले भागात वातावरण तंग बनले आहे. सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. सदर प्रकल्प बंद केल्याशिवाय जनता गप्प बसणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments: