Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 September 2008

अमिताभची सपशेल माफी, जयाला माफी मागण्यास सांगितले

नवी दिल्ली, दि.१० : आज बच्चन कुटुंबाजवळ जे काही आहे ते महाराष्ट्र आणि मुंबईनेच दिलेले आहे. याची जाणीव असल्याने आपल्या कुटुंबाने कधीही महाराष्ट्राचा अपमान केला नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
अभिषेक बच्चनच्या 'द्रोण' या चित्रपटाच्या ध्वनीफितींच्या उद्घाटन समारंभात जया बच्चन यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून उत्तर दिले. ते म्हणतात की, मी लंडनहून मुंबईला परततो आहे. पण, यावेळी अंत:करण अतिशय जड झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा आणि जयाचे वक्तव्य या वादाची माहिती मला मिळाली. इंटरनेटच्या माध्यमातून मी संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. कोणत्याही मुद्यावर निर्णय घेण्यापूर्वी त्यावर समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातूनही विचार करण्याची माझी पद्धत आहे. यावेळीही मी जया आणि तिच्या वक्तव्याचा विरोध करणाऱ्यांच्या बाजूने विचार केला. त्यातून मला लक्षात आले की, या सर्व प्रकरणात भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याचे मला लक्षात आले. त्यामुळे मी जयाला एसएमएस करून माफी मागण्यास सांगितले.
या एसएमएसमध्ये लिहिले आहे की, आज आपल्याजवळ जे काही आहे ते या महान राज्य आणि शहराने दिलेलेच आहे. आपण कधीही महाराष्ट्राचा अपमान केलेला नाही आणि कधी करणारही नाही. जर अनवधानाने असे झाले असेल आणि कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी आम्ही माफी मागतो. पण, या सर्व टिप्पणीपूर्वीच जया बच्चन यांनी माफी मागितली होती.
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान आहे. आम्हाला या देशाविषयी प्रेम आहे. आपल्या जन्मस्थानालाही आम्ही तेवढाच मान देतो. हेच प्रेम आणि असाच सन्मान आम्हाला आमच्या कार्यस्थळाबद्दलही आहे. मुंबई आणि महाराष्ट्राने आम्हाला ओळख दिली. आज मी ६६ वर्षांचा आहे आणि आपल्या वयाची ४० वर्षे मुंबईत घालविली आहेत. या शहराचा अपमान आम्ही करणे शक्यच नाही.
महाराष्ट्र आणि मराठी भाषेसोबत असलेला आपला संबंध सांगताना अमिताभ म्हणाले की, जयाने आपले शिक्षण पुण्यातील फिल्म इन्स्टिट्युटमध्ये पूर्ण केलेले आहे. तिला अस्खलित मराठी बोलता येते. आमच्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश महाराष्ट्रीयन आहेत. जयाचे काही खाजगी नोकर आहेत जे गेल्या ४० वर्षांपासून आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी ती मराठीत बोलते. खुद्द गेल्या ३५ वर्षांपासून माझा मेकअप करणारा दीपक सावंत महाराष्ट्रीयन आहे. मी आणि जयाने एका मराठी चित्रपटातही काम केले. त्यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही.
"श्वास' हा मराठी चित्रपट ऑस्करसाठी पाठवायचा होता तेव्हा निर्मात्याला पैशाची चणचण होती. त्यावेळी मी स्वत: त्यांना ११ लाख रुपये दिले होते. एबी कॉर्प या माझ्या निर्मिती कंपनीचा एक मराठी प्रकल्पही जयाने सुरू केला आहे. माझे फॅमिली डॉक्टर महाराष्ट्रीय डॉ. बर्वे आहेत. त्यांच्या संमतीशिवाय माझ्या कुटुंबातील कोणीही कोणताही उपचारविषयक निर्णय घेत नाही.
महाराष्ट्रातील विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मांडके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे लोखंडवाला येथे ४०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांच्या पत्नीने विनंती केल्यानंतर मी आणि अनिल अंबानी यांनी पुढाकार घेतला. आता ते रुग्णालय पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. माझे पिता हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा सर्वप्रथम अनुवाद मराठी भाषेतच झाला. काही मराठी लेखकांनी हरिवंशराय बच्चन यांची आत्मकथा मराठीत आणण्याची परवानगी माझ्याकडे मागितली होती. मी कॉपीराईटच्या रकमेचा विचार न करता आनंदाने त्यांना संमती दिली.
याशिवाय, आपण कोणकोणत्या महाराष्ट्रीय संस्था, संघटनांना मदत केली याचाही उल्लेख अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर केला आहे. पण, या कार्याचा आपण कधीही प्रचार केला नाही. या सर्व कार्यातून आमचा मुंबई आणि महाराष्ट्राविषयीचा अनादर दिसतो का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. अगदी शेवटी मात्र त्यांनी जया बच्चन यांची बाजू सावरीत त्यांचे वक्तव्य मराठी विरोधी नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून सादर करण्यात आला आहे. आम्ही या देशाचे साधे सरळ नागरिक आहोत. आज आम्ही जर शिखरापर्यंत पोहोचलो आहोत याचाच अर्थ आम्ही जे करतोय, त्यात काहीही गैर नाही, असाच होतो, असेही अमिताभ बच्चन म्हणाले.

No comments: