‘युवाशक्तीचा एकच निर्धार! कामत सरकारचे पतन हाच निर्धार!’
पर्वरीत उत्तर गोवा युवा मेळाव्याला अमाप प्रतिसाद
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोव्याच्या स्वत्वासाठी व पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने मातृभाषा रक्षणासाठी तरुणांनी छातीचा कोट करून सरकारविरोधात उठाव करावा असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांनी पर्वरी येथे केले. पर्वरी येथील आझाद भवनाच्या स्व. राम मनोहर लोहिया सभागृहात आज (दि.२२) उत्तर गोवा युवा विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. यावेळी श्री. वाघ युवाशक्तीला मार्गदर्शन करताना बोलत होते.
मेळाव्यात, ‘युवाशक्तीचा एकच निर्धार! दिगंबर कामत सरकारचे पतन हाच निर्धार!’ अशा वारंवार देण्यात येणार्या गगनभेदी घोषणांनी सभागृह दणाणून गेले. या युवा विद्यार्थी मेळाव्याला आज अमाप प्रतिसाद मिळाला. मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांनी सरकारच्या प्राथमिक शिक्षणाच्या इंग्रजीकरणाला जोरदार विरोध केला व मातृभाषा रक्षणासाठी उग्र आंदोलन करण्याची शपथ घेतली.
पुढे बोलताना श्री. वाघ यांनी युवा शक्तीने गोव्यातील अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. गेले दोन महिने भारतीय भाषा सुरक्षा मंचने विविध माध्यमातून सरकारचा इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय कसा चुकीचा आहे हे पटवून दिले. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक व युवक तथा विद्यार्थी या सवार्ंबरोबरच राज्यातील भजनी व इतर कलाकारांनी सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालून आपला रोष प्रकट केला आहे. तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यापुढे युवावर्गाच्या प्रखर आंदोलनात दिगंबर कामत सरकारची समिधा पडल्यावाचून राहणार नाही, असे प्रतिपादन केले. इंग्रजी ही जर पोट भरण्याची भाषा आहे तर डुक्करसुद्धा पोट भरतो, असे सांगून भाषेबरोबर इतिहास व संस्कृती असते म्हणून मातृभाषेचे रक्षण महत्त्वाचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.
जागतिक सिद्धांत अभ्यासा : पुंडलीक नाईक
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष इंग्रजी माध्यमाचे समर्थन करताना ज्यांना जे हवे ते देऊ! म्हणून सांगतात. भाषा ही वाटण्याची गोष्ट नाही हे शिरोडकर यांनी लक्षात ठेवावे व जगाच्या विरुद्ध चालण्याचा मूर्खपणा करू नये. असे प्रतिपादन पुंडलिक नाईक यांनी यावेळी केले.
मातृभाषा माणसाचा श्वास : प्रा. अनिल सामंत
मातृभाषा ही फक्त भाषा असत नाही तर ती माणसाचा श्वास असते. तिच्यातून चरित्र व संस्कृती निर्माण होते. गोव्याच्या सरकारने गोवेकरांचा श्वासच रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे. गोवेकरांचे चरित्र आणि संस्कृती पुसून टाकायला निघालेल्या असंस्कृत लोकांना धडा शिकवण्यासाठी युवा पिढीने संघटितपणे संघर्षास तयार राहावे असे प्रतिपादन प्रा. अनिल सामंत यांनी यावेळी केले.
तिसरा मुक्तिसंग्राम : प्रा. वेलींगकर
देशाचा व गोवा मुक्तीचा लढा हा पहिला मुक्तिसंग्राम, इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी हा दुसरा मुक्तिसंग्राम व कॉंगेसच्याच सरकारने लादलेले भाषामाध्यम हा तिसरा मुक्तिसंग्राम आहे. ज्या तरुणांना पहिल्या दोन मुक्तिसंग्रामात भाग घेता आला नाही, त्यांना दिगंबर कामत सरकारने या तिसर्या मुक्तिसंग्रामात भाग घेण्याचे सौभाग्य प्राप्त करून दिले आहे. त्याचा फायदा युवापिढीने घेऊन कामत सरकारला सळो की पळो करून सोडावे व भाषाप्रेमींच्या विजयाचे सैनिक बनावे असे आवाहन प्रा. सुभाष वेलींगकर यांनी यावेळी केले.
युवा शक्तीचे सामर्थ्य दाखवा : काकोडकर
सरकार बहिरे बनले आहे, त्यांना भाषाप्रेमींचा आवाज ऐकू येत नाही. त्या सरकारला आता युवा पिढीने आपल्या शक्तीचे सामर्थ्य दाखवून द्यावे. हेतू साध्य होईपर्यंत तीव्र संघर्ष करण्याची शपथ घ्यावी असे आवाहन शशिकला काकोडकर यांनी या प्रसंगी बोलताना केले.
युवा मंचचे निमंत्रक ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रनिवेदन वल्लभ केळकर यांनी केले.
Saturday, 23 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment