महत्त्वाकांक्षी माजी मंत्र्यांचा सहभाग
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली गोव्यावर राज्य करणार्या त्रिपक्षीय राज्य सरकारच्या सत्तेतील भागीदार असलेल्या राष्ट्रवादी पक्षात अनेक माजी आणि महत्त्वाकांक्षी मंत्री सहभागी झाल्यामुळे (काहीजण काही वर्षापूर्वीच दाखल झालेत) व राष्ट्रवादी पक्षाने राज्यातील सर्वच मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिल्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर निवडणुका लढवून राज्यातील पक्षाचे बळ अजमावण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसशी युती करून राष्ट्रवादी पक्षाला काहीही फायदा होत नाही, मात्र याचा कॉंग्रेसला भरपूर फायदा होत आहे. कॉंग्रेस पक्ष राज्यातील कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सत्तेत असूनही राष्ट्रवादी पक्षाला विश्वासात घेत नाही, अशी तक्रार पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक भारती चव्हाण यांनी अनेकवेळा केली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मगो या तिन्ही पक्षांतर्फे स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीची बैठक गेली दोेन वर्षे कॉंग्रेसने बोलावलेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसला फायदा करण्यापेक्षा स्वबळावर लढून बळ अजमावण्याचा विचार राष्ट्रवादीच्या राज्य व केंद्रीय नेतृत्वाचा असल्याचे कळते.
यापूर्वी कॉंगेस, भाजप व मगो या पक्षात राहून सत्तेची फळे चाखलेले व मंत्रिपद भूषवलेले सुरेश परुळेकर, प्रा. सुरेंद्र शिरसाट, डॉ. कार्मो पेगादो, पांडुरंग राऊत, विनयकुमार उसगावकर, अशोक नाईक साळगावकर, संगीता परब आदी अनेक माजी मंत्री राष्ट्रवादी पक्षात आहेत. यात किंगमेकर म्हणून नावलौकिक मिळवलेले माजी उद्योग मंत्री सुरेश परुळेकर यांनी ज्येष्ठ उपाध्यक्ष हे पद पटकावून राष्ट्रवादीत बस्तान बसवणे सुरू केले आहे. ते एक महत्त्वाकांक्षी नेते असून येत्या निवडणुकीत ते यापूर्वी निवडून आलेल्या आपल्या कळंगुट मतदारसंघातून ओबीसी कार्ड वापरून विद्यमान आमदार अग्नेल फर्नांडिस यांना शह देण्याची योजना आखत आहेत. दुसरे महत्त्वाकांक्षी नेते म्हणजे राष्ट्रवादीचे दुसरे ज्येष्ठ उपाध्यक्ष मगोचे माजी अध्यक्ष पांडुरंग राऊत. माजी वाहतूक मंत्री म्हणून काम केलेले राऊत आपल्या पारंपरिक डिचोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शेतकी महाविद्यालयाची मागणी करून कार्यरत झाले आहेत. तिसरे माजी मंत्री म्हणजे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष म्हणून काम केलेले डॉ. कार्मो पेगादो. डॉ. पेगादो यांनी तर आपल्या पारंपरिक सांत आंद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. विद्यमान कॉंग्रेस आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून येऊनही म्हणावा तसा विकास केला नाही, हा मुद्दा ते मतदारांना पटवून देत आहेत. माजी मंत्री व त्यातच डॉक्टर असल्याने त्यांचा मतदाराशी चांगला संपर्क आहे. मांद्रेच्या माजी आमदार तथा माजी शिक्षण मंत्री संगीता परब यांनी तर येथून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारांना शिर्डी व पंढरपूरच्या वारी करून त्यांनी आणल्या आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष व माजी पंचायत मंत्री तथा सभापती म्हणून काम केलेले प्रा. सुरेंद्र शिरसाट हे म्हापशातून निवडणूक लढवू इच्छितात. पक्षाचे अध्यक्ष असल्याने त्यांना तिकीटसुद्धा मिळेल हे नक्की. अचानक पक्ष बदलल्यामुळे त्याकाळी गाजलेले माजी शिक्षणमंत्री विनयकुमार हे नुकतेच राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले असून त्यांनी पाळीतून आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आपले काम सुरू केले आहे. तर नव्यानेच राष्ट्रवादी पक्षात दाखल झालेले शिवोलीचे माजी आमदार व माजी मंत्री अशोक नाईक साळगावकर यांनी निवडणुकीवर डोळा ठेवूनच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असून राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवणार हे गृहीत धरूनच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे बोलले जाते.
या माजी मंत्र्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी पक्षाकडे अनेक महत्त्वाकांक्षी व गेली काही वर्षे मतदारांची ‘सेवा’ करणारे अनेक धनवान उमेदवार असून या पैकी काहीजण युती झाल्यास अपक्ष लढू म्हणून सांगत आहेत. हे सर्व चित्र पाहता राष्ट्रवादी येती निवडणूक स्वबळावर लढवून जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करून आपले बळ अजमावण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त जागा लढवून तिरंगी किंवा चौरंगी लढतीचा फायदा घेऊन किमान दहा ते बारा उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवण्याची आणि सत्तेत मुख्य भागीदार बनण्याची योजना राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे. ही गोष्ट त्यांनी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे कळते. राष्ट्रवादीच्या गोवा प्रभारी श्रीमती चव्हाण यांनी गेल्या महिन्याभरात पत्रकारांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून या गोष्टीला पुष्टी मिळत आहे.
Monday, 18 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment