विश्वजितांकडून जनतेचा बुद्धिभेद
मोल हॉलचा उपयोग फक्त कॉंग्रेसच्या सभांसाठी
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून सत्तरी तालुक्याच्या विकासाचा बडेजाव मारला जातो. सत्तरीसारखा विकास उत्तर गोव्यातील अन्य मतदारसंघात व्हायचा असेल तर आपण सांगितलेल्या उमेदवारांच्या मागे उभे राहा, असे सांगून विश्वजित ते लोकांचा बुद्धिभेद करत आहेत. सत्तरी अजूनही अनेक बाबतीत अविकसित असून सध्या जो वरवरचा विकास होत आहे तो ३० वर्षापूर्वी सत्तरीवासीयांना अपेक्षित होता. सध्याच्या सत्तरीतील नियोजनशून्य विकासाचा येथील जनतेला किती फायदा आहे? हा संशोधनाचा विषय ठरू शकतो, असे प्रतिपादन पर्ये मतदारसंघाचे भाजप युवा कार्यकर्ते हनुमंत परब यांनी म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांनी सत्तरी तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी उद्या २१ रोजी मोर्ले येथे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते सत्तरीचा कायापालट केल्याचा दावा करतील. गेली अनेक वर्षे सत्तरीचे प्रतिनिधित्व प्रतापसिंग राणे करीत आहेत. काही काळ वगळता गोव्यात कॉंग्रेसचीच राजवट आहे व त्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान खुद्दप्रतापसिंग राणेंनाच जातो, असे असताना या तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका विरोधकांवर ठेवण्याचा कोणता अधिकार त्यांना पोहोचता? तसेच सत्तरीचा विकास आपणच केल्याचा दावा करणारे विश्वजित गेली तीस वर्षे सत्तरीचे प्रतिनिधित्व प्रतापसिंग राणे हे करत आहेत, म्हणजेच त्यांच्या काळात हा विकास झालेला नाही असा आरोप करत आहेत असेच म्हणावे लागेल असा टोलाही श्री. परब यांनी हाणला. सत्तरी आजही अनेक बाबतीत मागास आहे. शिक्षणाचा पर्यायाने ग्रामीण शाळांचा दर्जा वाढावा यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. गेली अनेक वर्षे सत्तरीतील अनेक शाळांत शिक्षकांची कमतरता आहे, इमारती मोडकळीस आल्या आहेत. वर्ग अपुरे पडतात. याकडे राणे यांनी लक्ष दिले नाही. एकतर खाणीसाठी ट्रक वा बेकार राहणे हे दोेनच पर्याय येथील युवकांसमोर आहेत, असे श्री. परब यांनी सांगितले.
मतांची गणिते मांडून व नियोजन न करता सत्तरीचा विकास केल्याने त्याचा जनतेला काहीच उपयोग नाही. वाळपई व्यापारी संकुल मोडून टाकले खरे पण व्यापार्यांच्या स्थलांतराची सोय न केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यांना आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे. गेली चार वर्षे सत्तरीतील शेतीकडे दुर्लक्ष करून आता निवडणुका तोंडावर आल्याने त्यांना अवजारे देण्याचे प्रकार सुरू आहेत. फक्त आपल्या कार्यकर्त्यांना या सुविधा पुरवण्याचे प्रकार सुरू आहेत. कृषिप्रधान सत्तरीतील लहान मोठ्या शेतकर्यांना मालकी हक्क मिळणे गरजेचे होते पण त्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. सत्तरीतील अनेक खाणींना विश्वजित यांच्याकडून संरक्षण मिळत आहे आणि त्यामुळे शेती व बागायती यांचा नाश होत आहे, असा आरोपही हनुमंत परब यांनी केला. एकीकडे सत्तरीत खाणींना अभय देणारे विश्वजित मुळगाव येथील वेदांतची खाण कोसळल्यावर तिथे पोहोचतात व लोकांना न्याय मिळवून देण्याची भाषा करतात. पिसुर्ले, सोनशी या खाणींना कुणाचे अभय आहे, होंडा भागात स्थानिकांच्या विरोधानंतरही मुख्य रत्यावरुन खनिज वाहतूक पावसाळ्यातही का सुरू आहे, हे कदाचित पणजीत वास्तव्य करणार्या आरोग्यमंत्र्यांना माहीत नसेल, असा टोलाही हनुमंत परब यांनी हाणला.
निरुपयोगी प्रकल्प
विश्वजित यांनी सत्तरीत काही प्रकल्प राबवले हे खरे. मात्र सदर प्रकल्पांचा स्थानिक वा परिसरातील लोकांना किती फायदा आहे याचा कुणीच अभ्यास केला नाही. सत्तरीत एक बडा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे मोर्ले येथील सभागृह. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या सभागृहाचा किती वापर होतो. वर्षातून दोन तीन लग्नसमारंभ वगळता या सभागृहात कॉंग्रेसचे मेळावेच भरवले जातात, अशी पुष्टी त्यांनी जोडली. होंडा- तिस्क येथे जागा उपलब्ध असताना नको तिथे कोट्यवधींचे बसस्थानक बांधले. या बसस्थानकावर बसेस येत नसल्याने हे बसस्थानक सध्या भटकी गुरे व कुत्र्याचे आश्रयस्थान बनले आहे. तसेच या परिसरातील दारुड्यांना रात्रीच्या पार्ट्या करण्यासाठी हे बसस्थानक फायदेशीर ठरले आहे.
वाळपई हे सत्तरीतील महत्त्वाचे शहर व एकमेव पालिकाक्षेत्र. इथे अजून बसस्थानक का नाही. येेथे बसस्थानक बांधण्यास इतकी वर्षे का लागली. होंडा येथे साधे आरोग्यकेंद्र नाही, मैदान नाही, बाजार प्रकल्प नाही व त्यामुळे भर रस्त्यावर बाजार भरवला जातो. महिलांचे सबलीकरण त्यांना पैसे वाटून व त्यांच्यात भांडणे लावून नव्हे तर त्यांचा सर्वांगीण व मानसिक विकास साधून त्यांना आत्मनिर्भर करण्यात व्हायला हवा. तसेच सत्तरीत दबावतंत्राचा वापर करत टीका करणार्यांना लक्ष्य बनवले जात असले तरी शूरांची परंपरा लाभलेल्या सत्तरीतील जनता याविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असेही परब यांनी यावेळी सांगितले.
राणे पितापुत्रांची दुहेरी नीती
एकीकडे मातृभाषेचा प्रश्न शिक्षणतज्ज्ञांनी सोडवावा असे म्हणायचे व दुसरीकडे या निर्णयाला छुपा पाठिंबा द्यायचा असे दुहेरी राजकारण राणे पितापुत्र करीत आहेत. सत्तरी हा मराठीचा बालेकिल्ला आहे. मतदारांनी या बाबत राणे पितापुत्रांना अवश्य जाब विचारावा असे सांगून सत्तरीवासीयांत जाज्वल्य राष्ट्रप्रेम व मातृभाषेप्रति निष्ठा आहे व येत्या काळात त्याची प्रचिती नक्कीच दिसून येईल, असेही श्री. परब यांनी शेवटी स्पष्ट केले.
Thursday, 21 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment