Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 July 2011

सत्तेवर आल्यास माध्यमाचा निर्णय बदलू

नेत्रावळीतील उटाच्या मेळाव्यात पर्रीकरांची ग्वाही
सांगे, दि. १७ (प्रतिनिधी): जनतेने आम्हांला पुन्हा एकदा सरकार बनवण्याची संधी दिली तर कॉंग्रेस सरकारने २५ मे रोजी घेतलेला माध्यम संदर्भातील निर्णय बदलून दाखवू असे उद्गार विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विचुंद्रे नेत्रावळी येथे चंद्रेश्‍वर देवस्थानच्या मंडपात नेत्रावळी आदिवासी मंचाने आज (दि.१७) आयोजित केलेल्या मेळाव्यात काढले. यावेळी व्यासपीठावर सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, जिल्हा पंचायत सदस्य नवनाथ नाईक, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, बाबुसो गावकर, प्रसाद गावकर, नेत्रावळीचे सरपंच शशिकांत गावकर, नानू बांडोळकर, पंच सदस्य सुभाष वेळीप, ऍड. उदय भेंब्रे, मंचाचे अध्यक्ष उदय गावकर आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. पर्रीकर म्हणाले की, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोमंतकीय विद्यार्थी आपल्यासारखे अडाणी राहू नयेत म्हणून आठवीपर्यंत सर्वच उत्तीर्ण होतील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र याच सरकारने इंग्रजीकरण करून गोमंतकीयांची संस्कृती नष्ट करू पाहणार्‍या सरकारचा प्रयत्न हाणून पाडा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी मालू वेळीप व गोविंद गावडे यांना पोलिसांनी अद्यापही कोठडीत ठेवल्याबद्दल सरकारचा निषेध केला. उटाच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे पूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी आश्‍वासन यावेळी दिले.
पैंगीणचे आमदार व उटाचे नेते रमेश तवडकर म्हणाले की, पोलिसांनी लाठीमार केल्याने २३ मे रोजी बाळ्ळी येथे पुकारलेल्या शांततामय मार्गने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागले. याला शासनच जबाबदार आहे. या जळीतकांडाचे खरे आरोपी गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि केप्याचे आमदार बाबू कवळेकर हे असल्याचा आरोप त्यांनी करून त्यांच्यावर खरेतर ३०७ कलम लावून त्यांना अटक करायला हवी होती, मात्र सरकार आम आदमीच्या नावावर चालणारे हे सरकार आम आदमीच्याच पाठीत सुरा खुपसत असल्याचा आरोप केला.
आमदार गावकर म्हणाले की, उटाची अनेक वर्षांची मागणी सरकारने पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले असते तर २५ मे रोजी घडलेली घटना घडली नसती. या भागात बेकायदा खाण व्यवसाय सुरू असून सरकार अनुसूचित जमातीच्या बागायती नष्ट करू पहात आहे. अशावेळी समाजबांधवांनी संघटित राहून सरकारला यापुढे धडा शिकवावा असे आवाहन केले.
गोव्यात २५ मे हा दिवस अत्यंत दुर्दैवी म्हणून गोमंतकीय सदैव लक्षात ठेवतील. जो प्रयत्न समाजाला खर्‍या अर्थाने न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. उटाच्या आंदोलनात शहीद झालेले दोघेही तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या बलिदानाला हा समाज कधीच विसरणार नाही. गोव्याची अस्मिता कोकणी आणि मराठी भाषांवरच टिकून आहे. इंग्रजीला अनुदान देण्याचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा असून त्यामुळे गोव्याची संस्कृती नष्ट होणार आहे. मंत्र्याचा पुत्र या भागात फिरून मतदारांसाठी यात्रांचे आयोजन करत आहे. त्याच्या या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केले.
यावेळी बोलताना ऍड. भेंब्रे म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण देणे हा शास्त्रीय सिद्धांत आहे. भारतातील मणिपूर सोडल्यास इतर राज्यातून मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. संस्कृती ही भाषेवर टिकून असते. बहुजन समाजाला अर्धशिक्षित ठेवण्यासाठी इंग्रजीकरणाचे सरकारने प्रयत्न चालवले आहेत. आपली संस्कृती टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. माध्यमप्रश्‍नी सरकारने आपला निर्णय बदलला नाही तर सरकारच बदलू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या मेळाव्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सूत्रसंचालन सरपंच शशिकांत गावकर यांनी केले.माजी पंच भिकू काळमो यांनी आभार मानले.
-------------------------------------------------------------
पणजीत आजधरणे
उटाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या दि. १८ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पणजीतील आझाद मैदानावर धरणे आयोजित केले आहे. यावेळी गोमंतकातील सर्व अनुसूचित जमातीतील बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केले आहे.

No comments: