Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 July 2011

मेल्विन गोम्स खूनप्रकरणी चार संशयितांना अटक

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): वेर्णा येथील गाजलेल्या मेल्विन गोम्स (२९) खून प्रकरणात चार संशयितांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद केली होती. त्यानंतर लोकांनी रास्तारोको करून पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर त्यांना निलंबित करून या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी मडगाव उपविभागीय उपअधीक्षक उमेश गावकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
या खूनप्रकरणी पोलिसांनी उपेंद्र सिंग, वरुण सिंग, राजेंद्र सिंग व सुबोध भक्ती या चौघांना ताब्यात घेतले आहे. दि. १५ जून रोजी मेल्विन गोम्स याचा पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाच्या ठिकाणी मृतदेह आढळून आला होता. मयत व्यक्तीचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. तसेच, त्याच्या डोक्यावर जखम असूनही पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने निरीक्षक दळवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी घेऊन आंदोलनही छेडण्यात आले होते. त्यावेळी निरीक्षक दळवी यांच्यासह उपनिरीक्षक सुशांत गावस यांनाही निलंबित करण्यात आले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी केले होते. तसेच, मयत व्यक्तीची दुसर्‍यांदा शवचिकित्सा करण्याची मागणी केली होती. दुसर्‍या शवचिकित्सा अहवालात मेल्विन याच्या शरीरावर जखम आढळून आली होती. याविषयीचा अधिक तपास पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर करीत आहेत.

No comments: