Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 21 July 2011

आसगावात मुख्यमंत्र्यांना ‘काळे बावटे’

कॉंग्रेस पदाधिकार्‍यांचा ‘भासुमं’ व भाजपतर्फे निषेध
म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी): शिवोली मतदारसंघातील आसगाव येथे कॉंग्रेसच्या मेळाव्याला जात असताना भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि भाजप कार्यकर्त्यांनी खोर्ली म्हापसा येथील डीएमसी कॉलेजजवळील घाटेश्‍वर मंदिरासमोर ‘काळे बावटे’ दाखवत निषेध केला. मुख्यमंत्री दिगंबर कामत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी जगमितसिंग ब्रार हे आज आसगाव येथे जात होते.
माध्यमप्रश्‍नी इंग्रजीकरणाचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री कामत आणि उपरोक्त प्रतिनिधी आसगाव येथे कॉंग्रेसच्या मेळाव्याला जाणार असल्याची माहिती भाषा सुरक्षा मंच आणि भाजप कार्यकर्त्यांना लागली. त्यामुळे दुपारी साडेतीन वाजल्यापासूनच या कार्यकर्त्यांनी घाटेश्‍वर मंदिराजवळ आपला मुक्काम ठोकला. म्हापसा पोलिसांना याची माहिती मिळताच निरीक्षक फौजफाट्यासह त्याठिकाणी येऊन त्यांनी कडक बंदोबस्त ठेवला.
संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान मुख्यमंत्री कामत, आरोग्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष शिरोडकर, तसेच प्रभारी ब्रार हे एकाच वाहनातून आसगाव येथे मेळाव्याला जात असताना निदर्शकांनी त्यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचा निषेध केला. यावेळी पंचायत सदस्य मनोज कोरगावकर, शिवोली मार्नाचे सरपंच सविता गोवेकर, पंच दिनेश पाटील, संजय हरमलकर, भासुमंचाचे समन्वयक तुषार टोपले, प्रताप खोर्जुवेकर, विश्‍वजित परब, रामा परब, रामेश्‍वर मांद्रेकर, नंदकुमार शिरोडकर तसेच इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments: