Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 23 July 2011

नव्या कॅसिनोचे उद्घाटन थाटात?

सूचना मिळूनही गृहखात्याचे दुर्लक्ष
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): मांडवी नदीतील एका जुन्या कॅसिनोचा ताबा ‘अंडरवर्ल्ड’ जगताशी संबंधित असलेल्या लोकांकडे जाण्याची कल्पना पोलिस गुप्तचर विभागाने चार महिन्यांपूर्वीच गृहखात्याला दिली होती. गृहखाते मात्र या माहितीवर केवळ बसून राहिले व आज प्रत्यक्ष या नव्या कॅसिनोचे थाटात उद्घाटन झाल्याचीही खबर प्राप्त झाली आहे.
गोव्यातील कॅसिनोंचा ताबा आता ‘अंडरवर्ल्ड’शी संबंधित लोकांच्या हाती जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. ‘जुगार’ व्यवसायात प्रसिद्ध असलेला व मुंबई पोलिसांना चकवा देऊन वेळोवेळी पसार होणारा हुमायूं चांदीवाला याचा कॅसिनो ‘प्राईम’शी संबंध असल्याच्या वार्तेमुळे पोलिस खातेही खडबडून जागे झाले आहे. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यासंबंधीच्या जाहिराती गेल्या काही काळापासून वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या. पोलिस गुप्तचर यंत्रणांनी याबाबत गृहखात्याला गेल्या चार महिन्यांपूर्वीच सतर्क केले होते पण त्याबाबत विशेष दखल घेतली नसल्याचेही कळते.
वदेशी गुंतवणुकीचा संशय
दरम्यान, गोव्यातील या कॅसिनो व्यवहारांत मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणुकीची शक्यता वर्तवून केंद्रातील सक्तवसुली संचालनालय (इडी) यांनी चौकशी चालवल्याची खबर आहे. गोव्यातील नव्यानेच सुरू होणार्‍या कॅसिनो ‘प्राईम’ हादेखील ‘इडी’च्या रडारवर असल्याची खबर असून त्याची चौकशी सुरू असल्याचे कळते. दरम्यान, प्रत्यक्ष कॅसिनोंसाठी गृहखात्याकडून परवाना मिळवल्यानंतर हा व्यवसाय इतरांना चालवण्यासाठी देताना गृहमंत्रालयाची मान्यता घेणे बंधनकारक आहे काय, असे विचारले असता गृहखातेही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचेच जाणवले. एखाद्या भल्या व्यक्तीने आपल्या नावावर कॅसिनो परवाना मिळवला व तो गुन्हेगारी व अंडरवर्ल्ड जगताशी संबंधित व्यक्तीला चालवण्यास दिला तर त्याबाबत गृहखाते काहीच कारवाई करणार नाही का, असा सवालही यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments: