सत्तारूढ आघाडीला दोन मतांचा फटका
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार शांताराम नाईक यांनी आज विरोधी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार दामोदर नाईक यांच्यावर २४ विरुद्ध १४ मतांनी विजय मिळवला. आघाडीतील आमदारांची संख्या २६ असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मिकी पाशेको हे मतदानासाठी फिरकलेच नाहीत तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचे मत बाद ठरवण्यात आले. एकीकडे भाजपचे सर्व १४ आमदार एकसंध राहिले असताना आघाडीतील दोन मते कमी झाल्याने कॉंग्रेसच्या विजयावर विरजणच पडले आहे.
आज पर्वरी विधानसभा संकुलात राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मतदान झाले. मुख्य निवडणूक अधिकारी गोणेश कोयू हे निवडणूक निरीक्षक म्हणून हजर होते. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली असता दुपारपर्यंत ३९ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मिकी पाशेको यांनी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. खासदार शांताराम नाईक यांनी राज्यसभेत फक्त भाषणबाजी केली व आपल्या मतदारसंघासाठी काहीच केले नाही, असा ठपका त्यांनी ठेवला. भाषा माध्यमप्रश्नी पालकांना दिलेल्या अधिकाराविरोधात भाजप असल्याने भाजपला मत देणार नाही तसेच मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सांगण्यावरूनच आपला छळ सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भाजपचे उमेदवार आमदार दामोदर नाईक यांनी निवडणुकीपूर्वी आघाडीतील काही आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असे वक्तव्य केल्याने शांताराम नाईक यांची झोप उडाली होती. कॉंग्रेस श्रेष्ठींनाही आघाडीतील वातावरणावर विश्वास नव्हता व म्हणूनच या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी जगमितसिंग ब्रार व राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांना पाचारण करण्यात आले होते. जगमितसिंग ब्रार यांनी हजेरी लावूनही कॉंग्रेस पक्षातील एक मत बाद ठरल्याने पक्षाची बरीच मानहानी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाद झालेले मत ऍड. दयानंद नार्वेकर यांचे होते. मतपत्रिकेवर कशा पद्धतीची निशाणी नोंदवावी याची कल्पना नसल्याने त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने खूण करण्यात आली व त्यामुळेच हे मत बाद ठरले. दरम्यान, ऍड.दयानंद नार्वेकर हे विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून नकळत चूक घडणे शक्य नाही,अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस गोटातून देण्यात आली. ऍड. नार्वेकर यांनी आपले मत बाद ठरवून उघडपणे श्रेष्ठींना आपल्या बंडखोरीचे संकेत दिल्याचेही बोलते जाते.
भाजपचे आमदार एकसंध
भाजपचे काही आमदार कॉंग्रेस पक्षाच्या गळाला लागले आहेत, अशा अफवा गेले काही दिवस राजकीय पटलावर पसरवण्यात आल्या होत्या. आज राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने या अफवांना कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या सर्व १४ आमदारांनी एकसंधपणे दामोदर नाईक यांना मतदान करून आपली एकजूट सिद्ध केली.
अनिल साळगावकरांची हजेरी
विधानसभा अधिवेशनावेळी बहुतांशवेळी गैरहजर राहणारे अपक्ष आमदार अनिल साळगावकर यांनी राज्यसभा मतदानासाठी जातीने हजेरी लावली. याठिकाणी त्यांचे स्वागत खासदार शांताराम नाईक यांनी केले. अनिल साळगावकर हे खाण उद्योजक आहेत. या उद्योजकांचा वारंवार संबंध केंद्रातील विविध मंत्रालयांशी येतो व त्यामुळेच त्यांनी या मतदानात सहभागी होणेच उचित मानले
आता जनतेनेच निकाल लावावा
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडे आवश्यक आमदारसंख्या नव्हती परंतु कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला बिनविरोध ही जागा मिळू नये यासाठीच उमेदवारी दाखल केली होती. राज्यात विविध विषयांवरून जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे. आघाडीतील अनेक नेते उघडपणे जनतेच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपल्याच सरकारला दोष देत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी आपला रोष व नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाली होती. पक्षातर्फे जारी करण्यात आलेला व्हीप व पक्षाची बांधीलकी जपून कॉंग्रेस आमदारांनी शांताराम नाईक यांना मतदान केले. म.गो पक्षाने सुरुवातीला शांताराम नाईक यांना विरोध दर्शवला होता, पण नेहमीच्या सवयीप्रमाणे अखेर कोलांटी मारून कॉंग्रेसच्या बाजूने राहणेच पसंत केले. म.गो आमदारांचा खरा चेहरा आता लोकांना कळून चुकला आहे, असे दामू नाईक म्हणाले. आता यापुढे या सरकारला जनतेनेच धडा शिकवावा लागेल, असेही दामू म्हणाले.
Saturday, 23 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment