Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 19 July 2011

उगे बगलरस्त्याची कल्पना ज्योकीम यांचीच


वासुदेव मेंग गावकर यांचा गौप्यस्फोट


ज्योकीम व युरी आलेमाव यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप




पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)
नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांचा सांगे परिसरात खाण व्यवसाय चालतो. या खाण व्यवसायाला फायदेशीर ठरेल या हेतूने त्यांनीच दाभामळ - कोटार्ली ते उगेपर्यंतच्या खाण बगल रस्त्याची शिफारस सरकारला केली होती, असा गौप्यस्फोट सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी केला. या बगलरस्त्याला विरोध असल्याचे भासवून लोकांबरोबर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणारे ज्योकीम आलेमाव व युरी आलेमाव ढोंगी आहेत, असा सनसनाटी आरोप आमदार श्री. गावकर यांनी केला.
उगे बचाव समितीतर्फे बोलावण्यात आलेल्या सभेत नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव व सांगेतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले त्यांचे पुत्र युरी आलेमाव यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देताना आमदार वासुदेव मेंग गावकर बरेच आक्रमक झाले. उगे बचाव समितीच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे, असे स्पष्ट करतानाच या बैठकीच्या निमित्ताने राजकारण झाल्यानेच आपण या बैठकीला हजर राहिलो नाही, असेही ते म्हणाले. सुरुवातीस ही बैठक उगे पंचायतीत घेण्याचे ठरले होते. या बैठकीला ‘जीएसआयडीसी’चे अधिकारी लोकांची गार्‍हाणी ऐकण्यासाठी येणार होते. परंतु अचानक ही बैठक चर्च सभागृहात स्थलांतरित केली. बगल रस्त्याला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीला ज्योकीम व युरी यांचे छायाचित्र असलेला बॅनर कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सांगे परिसराची खाण उद्योगामुळे वाताहत झाली आहे. येथील रिवण, कावरे, तिळामळ भागातील लोकांचे जगणेच हैराण झाले आहे. सांगेचे पालकमंत्री असूनही ज्योकीम यांनी या लोकांसाठी काय केले, याचा जाब त्यांनी द्यावा, अशी मागणी श्री. गावकर यांनी केली. सांगेतील बेकायदा खाण व्यवसाय, खनिज धूळ प्रदूषण, खनिज वाहतुकीमुळे गेलेले बळी यांचे काहीही सोयरसुतक आलेमाव यांना नाही. केवळ आपले पुत्र युरी यांना निवडून आणण्यासाठी त्यांना अचानक सांगेवासीयांचा पुळका आल्याचा टोलाही श्री. गावकर यांनी हाणला.
एरवी शांत व मितभाषी म्हणून परिचित असलेले आमदार वासुदेव मेंग गावकर यांच्यावर आलेमाव पितापुत्रांनी कमजोरपणाचा आरोप केल्याने ते चांगलेच भडकले आहेत. आलेमावांनी भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशांसमोर आपण कमजोर जरूर असू; परंतु सांगेतील जनतेचे प्रतिनिधित्व करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत, असा ठोसाही त्यांनी लगावला. सांगे तालुक्याला खाणींंचा विळखा पडला आहे. या तालुक्यातून खनिज उत्खनन करून खाणमालक कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत तर सांगेवासीय मात्र हलाखीचे जीवन जगत आहेत. गेली दहा वर्षे खाण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत व सांगेत खाण व्यवसाय करणारे ज्योकीम हेच या परिस्थितीला जबाबदार आहेत. आलेमाव पालिकामंत्री असताना सांगे पालिकेतील कर्मचार्‍यांना पगाराविना काम करण्याची पाळी का आली, असा प्रश्‍नही त्यांनी केला.
गोवा राज्य नगर विकास प्राधिकरणामार्फत सर्व विकासकामे फक्त आपल्या कुंकळ्ळीत राबवलेल्या ज्योकीम यांनी सांगे पालिकेसाठी काय दिले, असा प्रश्‍न त्यांनी केला. आपण विधानसभेत सांगेतील बेकायदा खाण उद्योग, बेदरकार खनिज वाहतूक या विरोधात सातत्याने आवाज उठवला. सांगेतील शेतकर्‍यांचे प्रश्‍न, साळावली धरणग्रस्तांच्या अडचणी तसेच सांगेतील विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा केला. सांगेतील खाण उद्योगात सहभागी असलेले ज्योकीम आता हा मतदारसंघ आपल्या मुलाकडे ठेवण्याचा घाट घालत आहेत. आधीच खाण उद्योजकांनी सांगेची वाताहत लावली आहे व त्यात हा मतदारसंघ खाण उद्योजकांच्या हवाली करून इथले लोक आपल्या मरणाला आमंत्रण देण्याचा मूर्खपणा कदापि करणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी बोलून दाखवला. ज्योकीम उगे येथे बगल रस्त्याला विरोध करीत आहेत तर त्यांचे बंधू तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव हे स्थानिकांचा विरोध डावलून पंचवाडी येथे बगलरस्ता करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आलेमावबंधूंची ही सगळी नाटके आता गोमंतकीयांना चांगलीच परिचित झाली आहेत. येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल, असा टोला श्री. गावकर यांनी हाणला. आलेमाव कुटुंबीयांना गोवा आंदण देऊन कॉंग्रेस पक्षाने गोव्यावर ‘किंग मोमो’ची राजवट आणण्याचा घाट घातला आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

No comments: