Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 22 July 2011

दामोदर वरुद्ध शांताराम

राज्यसभेसाठी आज मतदान


पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
राज्यातील एकमेव राज्यसभा खासदारपदासाठी उद्या शुक्रवार दि. २२ रोजी मतदान होणार आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे विद्यमान खासदार शांताराम नाईक तर विरोधी भाजपतर्फे फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्यात ही लढत होणार आहे. आघाडी सरकारातील सर्व घटक आपल्या बाजूने ठामपणे उभे राहतील, असा विश्‍वास शांताराम नाईक यांनी व्यक्त केला आहे तर सत्ताधारी आघाडीतील किती लोक आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करतात याचा उलगडाच या निवडणुकीत होणार असल्याचे दामू नाईक म्हणाले.
पर्वरी विधानसभा संकुलात उद्या २२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल. मतमोजणी संध्याकाळी ५ वाजता होणार असून तदनंतर लगेच निकाल घोषित करण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी दिली. राज्यसभेसाठी विधानसभेतील चाळीसही आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. राज्यसभेसाठीचे मतदान खुल्या पद्धतीने होते व तिथे मतदान करणारा सदस्य आपण कुणाला मत दिले हे दाखवू शकतो, असेही श्री. नावती यांनी सांगितले.
खासदार नाईक यांनी आपल्याला २६ मते मिळतील असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यात कॉंग्रेस-२०, राष्ट्रवादी कॉंग्रेस-३, म. गो-२ व अपक्ष-१ यांचा समावेश आहे. भाजपकडे १४ आमदार आहेत व त्यामुळे आघाडीतील आमदारांनी ‘क्रॉसवोटींग’ केले तरच त्याचा लाभ दामोदर नाईक यांना होऊ शकतो. राष्ट्रवादीचे आमदार मिकी पाशेको यांनी आपण सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करू, असे म्हटले आहे. म. गो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांनी सुरुवातीला शांताराम नाईक यांना विरोध दर्शवला होता. ढवळीकरबंधुंविरोधात सभापती प्रतापसिंग राणे यांच्याकडे अपात्रता याचिका प्रलंबित आहे व त्यामुळे या याचिकेची भीती दाखवून त्यांचा पाठिंबा मिळवणे कॉंग्रेससाठी सोपे झाले आहे. ढवळीकरबंधुंनी तात्काळ आपला विरोध बाजूला सारून शांताराम नाईक यांना पाठिंबा जाहीर करण्यामागे हेच कारण असावे, असा संशय व्यक्त केला जातो.
भाषा माध्यमप्रश्‍नावरून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा राज्यसभा मतदानावर परिणाम पडण्याचा धोका लक्षात घेऊन कॉंग्रेस श्रेष्ठींकडून जगमितसिंग ब्रार व सुधाकर रेड्डी यांना गोव्यात पाठवले आहे. या नेत्यांनी आज सर्व कॉंग्रेस आमदारांशी चर्चा केली. संध्याकाळी व्हीप जारी करण्यात आला. दरम्यान, भाषा माध्यमप्रश्‍नी कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय चुकीचा होता याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी कॉंग्रेस पक्षातील मातृभाषा समर्थक आमदारांना या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. या संधीचा उपयोग करण्याचे धाडस किती आमदार दाखवतात हेच पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

No comments: