पोलिस महासंचालकांची शरणागती
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): पोलिस अधीक्षकाच्या बदलीवरून सरकारला आव्हान देणार्या महासंचालकांनीच अखेर माघार घेतली. तर, सरकार मात्र या बदलीच्या आदेशावर ठाम असल्याचे उघड झाले आहे. या बदलीच्या आदेशावर पुन्हा विचार करण्यासाठी कोणतीही दुसरी बैठक होणार नसून या आधी काढलेल्याच आदेशानुसार पोलिस अधीक्षकांच्या बदल्या होणार असल्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे पोलिस खात्याला पोलिसी शिस्त लावू पाहणार्या पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कार्मिक खात्याने पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. हे आदेश काढण्यापूर्वी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा दावा करून डॉ. आर्य यांनी गृहखात्याला पत्र लिहिले होते. तसेच त्यांनी रजेवर जाण्यापूर्वी कोणीही नव्या जागेचा ताबा सांभाळू नये, असे पत्र सर्व पोलिस अधीक्षकांना लिहिले होते. या पत्रामुळे एकच खळबळ माजून बाहेरगावी गेलेल्या पोलिस महासंचालकांना काल सायंकाळी तातडीने गोव्यात बोलावून घेण्यात आले. काल सायंकाळी पोलिस मुख्यालयात आल्यानंतर पोलिस महासंचालकांनी आपल्याला न विचारता बदल्या करण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका घेत या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, या एकूण प्रकरणावरून पोलिस खात्यात आणि अधिकार्यांच्या बदल्यांत मोठ्या प्रमाणात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप होत असल्याचे उघड झाले आहे.
गोवा पोलिस खात्याचा ताबा स्वीकारलेले डॉ. आदित्य आर्य यांना सुमारे अडीच महिन्याचा काळ लोटला आहे. या दरम्यान, पोलिस अधिकार्यांवर झालेले आरोप, निरीक्षकांनी केलेली बेकायदा कृत्ये आणि पोलिस शिपायांनी केलेले आत्महत्या प्रकरण पाहण्यास मिळाल्याने पोलिस खात्याला शिस्त लावण्याची अपेक्षा बाळगून त्यानुसार योग्य ठिकाणी योग्य अधिकार्यांच्या बदल्या करण्याचा मनसुबा डॉ. आर्य यांनी बाळगला होता. त्यांच्या या मनसुब्यावर पाणी फेरत सरकारने मात्र, आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या केल्याची जोरदार चर्चा सध्या पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे.
Wednesday, 20 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment