भाईड कोरगाव खाण प्रकरण
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) ः
भाईड कोरगाव येथील बेकायदा खाण प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव जितेंद्रे देशप्रभू यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. श्री. देशप्रभू यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने येत्या दि. २५ जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, तक्रारदार काशिनाथ शेटये यांनी हस्तक्षेप अर्ज सादर केला आहे.
बेकायदा खाण प्रकरणात अद्याप मुख्य संशयिताला का अटक केली नाही, असा प्रश्न करून गुन्हा अन्वेषण विभागाला सत्र न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही फटकारल्यानंतर श्री. देशप्रभू यांची अटक निश्चित झाल्याने त्यांनी सध्या धडपड सुरू केली आहे. मात्र, श्री. देशप्रभू यांना ‘सीआयडी’ विभागाकडून पूर्ण संरक्षण मिळत असल्याचे उघड होत आहे. श्री. देशप्रभू यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र दोन्ही वेळा त्यांनी या समन्सना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तरीही त्यांना अटक करण्याचे कोणतेही प्रयत्न करण्यात आले नसल्याचा चर्चा सध्या सुरू झाली आहे.
सुमारे ५० कोटी रुपयांचे खनिज बेकायदा भाईड कोरगाव खाणीवरून नेण्यात आले असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच, खाण संचालनालयाने श्री. देशप्रभू यांना या प्रकरणात दोषी करून ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांचाही रक्कम अद्याप जमा करण्यात आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणात खाण संचालनालयाचे संचालक अरविंद लोलयेकर यांनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tuesday, 19 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment