Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 17 July 2011

डिचोलीला पुराचा तडाखा

हमरस्ता जलमय-वाहतूक ठप्प-घरांवर झाडे कोसळली-पूरनियंत्रण योजना कुचकामी
डिचोली, दि. १६ (प्रतिनिधी): मोठा गाजावाजा करून उभारलेली पूरनियंत्रण यंत्रणा अखेर कुचकामीच ठरल्याने डिचोलीला आज पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसला. त्यामुळे हमरस्ता पाण्याखाली जाऊन तीन तास वाहतूक खोळंबली. पुराच्या पाण्याने शांतादुर्गा सर्कलला वेढा घातल्याने बरीच धांदल उडाली व त्यामुळे शांतादुर्गा हायस्कूलला सुट्टी देण्यात आली. पावसाच्या तडाख्यात विविध ठिकाणी घरांवर झाडे कोसळल्याने सुमारे तीन लाखांची हानी झाली.
काल रात्री राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही डिचोलीला पुराचा विळखा पडला. सकाळी सहाच्या दरम्यान पुराचे पाणी शहरात शिरले. शांतादुर्गा सर्कल, हमरस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. वाडे येथे मुभा गॅरेजमध्ये पाणी शिरल्याने २५ हजारांची हानी झाली. हातुर्ली येथे धनंजय हळदणकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून एक लाखाचे नुकसान झाले. हातुर्ली येथे शोभा गावडे यांच्या मातीच्या घरावर झाड पडल्याने ६० हजारांची हानी झाली. चोडण, नावेली, साळ, कुडव येथे अशीच झाडे कोसळून अनेकांना फटका बसला. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य करून अडथळे दूर केले.
गाडी पाण्यात अडकली
डिचोली हमरस्त्यावर पुराचे पाणी भरल्याने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक गाडी अडकून पडली. नंतर तिला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. पाण्याची पातळी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन शांतादुर्गा हायस्कूल, शिशूवाटीका व प्राथमिक शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. मामलेदार प्रमोद भट, उपजिल्हाधिकारी नारायण गाड, जलसंशोधन खात्याचे श्री. आजगावकर आदींनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली.
पूरनियंत्रण यंत्रणा अपयशी
दरम्यान, लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पूरनियंत्रण यंत्रणा अखेर कुचकामीच ठरल्याचे चित्र आज दिसून आले. या योजनेअंतर्गत नदीतील गाळ उपसण्यात आला आहे. मात्र, तो काठावरच साठलेला असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नाही. अखेर सकाळी ९.३० नंतर पुराचे पाणी हळूहळू ओसरले.
दरम्यान, पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारी यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. अंजुणे धरणातील पाण्याने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. ती ओलांडताच तेथून पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने त्यानंतर डिचोलीत पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments: