बालिकेवर हल्ला करणारा ‘तो’ कुत्रा मेला
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पणजी नागरी आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पालेकर यांनी महापालिकेला पणजीतील कुत्री पकडण्याचे निवेदन देऊनही पणजी महापालिकेने त्याकडे कानाडोळा केल्याने पणजीकरांचा जीव धोक्यात आला आहे. राजधानीत भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून काल सहा वर्षाच्या एका बालिकेवर हल्ला करणारा कुत्रा आज मेल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
काल उशिरा डॉ. दादा वैद्य मार्गावरील पदपथावरून आपल्या आईसोबत जात असलेल्या एका सहा वर्षाच्या बालिकेवर एका भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. त्याने थेट त्या मुलीच्या तोंडाचा चावा घेऊन तिचे दात पाडले. सदर कुत्रा आज दि. २३ रोजी मरण पावल्यामुळे तो रॅबीजग्रस्त होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या (रॅबीजग्रस्त) कुत्र्याने पणजीतील तब्बल ४४ जणांचा चावा घेतला होता व तो कुत्रा दुसर्याच दिवशी मेला होता. या ४४ जणांपैकी अनेकजण अजूनही आपल्या सुजलेल्या पायावर व चिघळलेल्या जखमांवर उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यावेळी पणजी आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. पालेकर यांनी पणजी महापालिकेला पत्र लिहून ‘तो’ कुत्रा शहरातील अन्य कुत्र्यांना चावलेला असू शकतो व त्यामुळे त्याने चावा घेतलेले अन्य कुत्रेही काही दिवसांनी पिसाळू शकतात, अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. मात्र, महापालिकेकडे कुत्रे ठेवण्यास जागा अपुरी असल्याचे सांगण्यात आले. आता डॉ. पालेकर यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून अनेक भटके कुत्रे पिसाळलेल्या स्थितीत आहेत.
हे कुत्रे पणजीवासीयांना चावत सुटले आहेत. पणजीवासीयांच्या सुरक्षेसाठी शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्याची अत्यंत निकड उत्पन्न झाली आहे.
Sunday, 24 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment