Tuesday, 19 July 2011
ज्ञानप्रसारक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून ‘काळा दिन’
मातृभाषेच्या संवर्धनाला युवापिढी सरसावली
म्हापसा, दि. १८ (प्रतिनिधी)
आसगाव येथील ज्ञानप्रसारक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माध्यमप्रश्नी सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत आसगाव ते म्हापसा बसस्थानक अशी दोन किमी लांबीची निषेध फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माध्यमप्रश्नी बहुतेक विद्यार्थ्यांनी काळे टी शर्ट परिधान करत ‘काळा दिन’ पाळला.
गोव्याची राजभाषा जपणे हे आमचे कर्तव्य आहे. लहानसहान विद्यार्थ्यांवर कॉंग्रेसने इंग्रजी भाषा लादली आहे. आपली मायभाषा ही आपली आई असते. जर आपल्या आईचीच काळजी आम्ही मुलांनी घेतली नाहीतर काय होईल? गोव्याची मराठी आणि कोकणी भाषाच पुसून गेली तर गोव्याचे नागालँड होईल. गोव्याची संस्कृती टिकवली नाही तर गोवा हा गोवा राहणार नाही. माध्यम प्रश्नी प्रत्येक पालकाने आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन अनिकेत केरकर यांनी यावेळी बोलताना केले.
आसगाव येथील ज्ञानप्रसारक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सुरक्षा मंचच्या सहकार्याने ‘गेट ऑफ सून’ या गटातर्ंगत ज्ञानप्रसारक हायस्कूलच्या आवारात घेतलेल्या बैठकीत त्यांनी बोलताना केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध फेरीत बहुसंख्य महाविद्यालयीन मुलांनी काळे टी शर्ट परिधान करून ‘दिगंबर पातकी, मायभासेचो घातकी’, इंग्लिश आमका नाका, आमची माय भासाच आमका जाय’ अशा घोषणा देत मंत्री चर्चिल आलेमाव, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा निषेध केला. ही निषेध फेरीचीखोर्लीमार्गे कदंब बसस्थानकावर जाऊन समाप्ती केली.
गोव्याची युवा शक्ती एकत्र झाली आहे. युवा शक्तीची ताकद ओळखून इंग्रजी भाषा राज्यावर थोपण्याचा सरकारने चालवलेला प्रयत्न त्वरित मागे घ्यावा अन्यथा युवापिढीला सावरणे कठीण जाईल असा इशारा राजदीप नाईक यांनी दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment