Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 July 2011

एसपींच्या बदल्यांवरून पोलिस-सरकार संघर्ष शिगेला..!

तूर्त ताबा न घेण्याचा
डॉ. आर्य यांचा आदेश

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांवरून राज्याचे पोलिस महासंचालक आणि सरकार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असून आपण गोव्यात येईपर्यंत नव्या कामाचा ताबा स्वीकारू नका, असे पत्र पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी संबंधित पोलिस अधीक्षकांना लिहिले आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश काढणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि गृहमंत्री रवी नाईक यांची जबरदस्त कोंडी झाली आहे. सध्या डॉ. आर्य गोव्याबाहेर आहेत.
येत्या १ ऑगस्ट रोजी आपण गोव्यात येणार असून तोवर कोणीही अधीक्षकाने आपले सध्याचे पद सोडू नये, असे स्पष्ट आदेश डॉ. आर्य यांनी आपल्या अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे काही अधिकार्‍यांचीही गोची झाली आहे. ज्याप्रकारे नवीन बदल्या झाल्या आहेत ते बदल पाहिल्यास खुद्द पोलिस अधिकारीदेखील चक्रावले आहेत. विधानसभेच्या आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून या बदल्या केल्याची रंगतदार चर्चा यासंदर्भात ऐकायला मिळते. याची कुणकुण पोलिस महासंचालक डॉ. आर्य यांनाही लागल्याने त्यांनी या बदल्यांच्या आदेशावर पुन्हा विचार केला जावा, असे पत्र गृहखात्याला लिहिले होते. तसेच, बदलीचे आदेश काढण्यापूर्वी आपल्याला विश्‍वासात घेतले नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले होते. मात्र, पोलिस महासंचालकांना याची पूर्ण कल्पना दिली होती, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतले आहे. त्यामुळे कोण सत्य बोलत आहे यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपदी वामन तारी यांची बदली करण्यात आली आहे. त्यास पोलिस महासंचालकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, अधीक्षक ऍलन डिसा यांच्याकडे इमिग्रेशनऐवजी किनारी पोलिस विभागाचा ताबा द्यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. नव्यानेच गोव्यात आलेले आयपीएस अधिकारी विजय सिंग यांच्याकडे केवळ अमली पदार्थविरोधी पथकाचा ताबा दिला जावा, असेही सुचवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्याकडे अमलीपदार्थ विरोधी पथकासह ‘आयआरबी’चाही ताबा सोपवण्यात आला आहे.

No comments: